पिंपरी, ता. २७ : ‘अवजड वाहनांमुळे शहरात अपघातांची मालिका सुरू आहे. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या वाहनांवर केवळ निर्बंध लागू करू नयेत; तर कठोर कारवाई केली जावी,’’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर, ठराविक ‘लॉबी’च्या दबावामुळे पोलिस या वाहनचालकांवर कारवाई टाळतात, असाही गंभीर आरोप केला जात आहे.
शहरात भरधाव फिरणाऱ्या, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या, तसेच नंबर प्लेट न लावता सर्रास रस्त्यावर येणरी अवजड वाहने शहरातील नागरिकांसाठी काळ ठरत आहेत. अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी या वाहनांच्या बंदीच्या तासांमध्ये वाढ केली. मात्र, बंदीच्या काळातही ही वाहने रस्त्यावर येत आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, नागरिकांशी हुज्जत वाढणे, नंबरप्लेट नसणे किंवा मातीने झाकणे हे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नसल्याची तक्रार केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचे नियम तोडल्यास ऑनलाइन दंड केला जातो. मात्र, नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या अवजड वाहनांना कडक शासन करण्यास पोलिस प्रशासन कचरते. त्यामुळे अवजड वाहनांना अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुनावळे आणि मारुंजी येथे झालेल्या दोन अपघातांमघ्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन तरुणींचा जीव गेला. त्यामुळे शहरातील खराब रस्ते व बेदरकार अवजड वाहने हे या अपघातांसाठी कारणीभूत असल्याने प्रशासनावर सर्वच स्तरांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. काही संघटनांनी आपल्या मागणीचे पत्रही पोलिसांना दिले. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी पीएमआरडीए, वाहतूक विभाग यांच्यासोबत बैठक घेऊन काही कठोर नियम लागू केले. मात्र, हे नियम केवळ कागदावरच राहू नये तर त्याची अंमलबजावणीही व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
‘डंपरचालक किंवा अवजड वाहनांवर होणारी कारवाई काही काळानंतर थंडावते. असे प्रकार भविष्यात होऊ नयेत, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आतापर्यंत केवळ आश्वासन मिळत होती. आता या नियमांचे परिपत्रक निघाले आहे. त्यामध्ये आमच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, याची ठोस अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.’
- प्रशांत पंडित, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज
‘पुनावळेत तीन महिन्यांमध्ये झालेल्या अपघातात दोन महिलांचे बळी गेलेले आहेत. या परिसरात अवजड वाहनांची बंदीच्या वेळातही वर्दळ असते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चालक कोणतीही भीड न ठेवता बेभानपणे गाड्या चालवतात. नागरिकांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. मात्र, त्यांच्यावर वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ नियमावली करून उपयोग नाही तर कठोर कारवाईही हवी.
- सुमीत ढगे, रहिवासी, पुनावळे
या वर्षी आतापर्यंत ८५ हजार वाहनांवर केलेल्या कारवाईत ११ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे. यातील बहुतांश दंड हा बंदीच्या वेळात वाहन रस्त्यावर आल्यामुळे केलेला आहे. आता अपघात टाळण्यासाठी वाहने रस्त्यांवर येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे.
- विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग
PNE25V71509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.