पिंपरी, ता. ३० ः उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या मुदतवाढीनंतरही मोठ्या संख्येने वाहनचालकांनी नंबर प्लेट बदलून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता विभागाने आणखी मुदतवाढ देत ३१ डिसेंबरपर्यंत एचएसआरपी बसविण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. वाहनचालकांनी नियत मुदतीत एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
परिवहन विभागाने राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक केले आहे. परिवहन विभागाने एक जानेवारीपासून ‘एचएसआरपी’ बसविण्याची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘एचएसआरपी’ उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एचएसआरपीसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ९१ लाख वाहनचालकांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, ७३ लाख वाहनचालकांनी एचएसआरपी बसवून घेतले आहे. परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अजूनही लाखो वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बाकी आहे. त्यामुळे परिवहन विभागाने आता चौथ्यांदा एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एचएसआरपी बसविण्यासाठी सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. पण, एचएसआरपीसाठी मोठ्या संख्येने बुकिंग केल्यामुळे दोन ते तीन महिने वेटिंग करावे लागत होते. त्यामुळे परिवहन विभागाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही लाखो वाहनांना एचएसआरपी बसविणे बाकी असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. तीनवेळा मुदतवाढ देऊनही एप्रिल २०१९ पूर्वीच्या १०० टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून झाले नसल्याने आता पुन्हा एकदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
‘‘एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत वाहनचालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
तीनवेळा मुदतवाढ
पहिल्यांदा ः ३० एप्रिल २०२५
दुसऱ्यांदा ः १५ ऑगस्ट २०२५
तिसऱ्यांदा ः ३० नोव्हेंबर २०२५
चौथ्यांदा ः ३१ डिसेंबर २०२५
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.