पिंपरी, ता. २९ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात पन्नासहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत एक हजारांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
डेटा विश्लेषणाद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून सीएचडीसी प्रकल्प कार्यरत आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये महापालिकेने मेळावा आयोजित केला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांचा समावेश होता. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. मुलाखतीच्या माध्यमातून कंपन्यांनी विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करत नियुक्तिपत्रही दिले. उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदींनी मेळाव्याला भेट दिली.
महापालिका उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या, ‘‘रोजगार मेळाव्याने कंपन्या आणि तरुणांमधील दुवा मजबूत करून तरुणांना एक परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कंपन्यांच्या उत्साही सहभागामुळे आणि उमेदवारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हेच आमच्या कार्याचे खरे बलस्थान आहे.’’
‘‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाचे एक उद्दिष्ट म्हणजे शहरातील सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबवणे. आजच्या रोजगार मेळाव्यात तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि कंपन्यांकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद समाधान देणारा आहे. पुढील काळातही अशा संधी अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या आमच्या योजना आहेत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका
‘‘आमचे ध्येय समाजातील तरुणांना कौशल्य, मार्गदर्शन आणि योग्य संधी उपलब्ध करून देणे आहे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या आणि तरुण एकाच व्यासपीठावर येऊन परस्पर संवाद साधू शकले, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. भविष्यातही आम्ही समाजहितार्थ अशा उपक्रमांना सतत पाठबळ देत राहण्याचा निर्धार व्यक्त करतो.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.