हिंजवडी, ता. १ ः आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद चालकाने भरधाव बस थेट पदपथावर चढवली. त्याखाली चिरडून दोन बहिणी आणि भाऊ अशी तीन सख्खी भावंडे मृत्युमुखी पडली. सोमवारी (ता. १) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पंचरत्न चौकात ही दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू झाल्याने हिंजवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्चना देवेंद्र ऊर्फ देवा प्रसाद (वय ८), सूरज देवेंद्र ऊर्फ देवा प्रसाद (वय ६) यांचा जागेवरच करुण अंत झाला. त्यांची मोठी बहीण प्रिया (वय १६) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) प्रथमोपचार करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात नेण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले. विमल राजू ओझरकर (वय ४०) या किरकोळ जखमी झाल्या. हिंजवडी पोलिसांनी तत्काळ दुर्घटनास्थळी धाव घेऊन बसचालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी, मूळ गाव धाराशीव) याला अटक केली. याप्रकरणी विमल ओझरकर यांचे नातेवाईक स्वप्नील जांभूळकर यांनी फिर्याद दिली.
मोठी बहिण प्रिया ही लहान भाऊ आणि बहिणीला जिल्हा परिषदेच्या हिंजवडी शाळेत घेऊन घरी येत होती. अर्चना चौथीत, तर सूरज पहिलीत शिकत होता. प्रिया ही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होती. ती भावंडांसह घरापासून जेमतेम अगदी हा पावलांवर असताना काळाने घाला घातला. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या अपघातांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील गेल्या काही महिन्यांतील अपघातांची मालिका थांबत नसल्याने नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
गंभीर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अविनाश यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
---
नियंत्रण सुटले आणि....
आयटी पार्क फेज तीनमधील ॲपिव या कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरी सोडणारा चालक नागनाथ (बस क्रमांक एमएच १४ एलएल ७७३३) याने मद्यप्राशन केले होते. त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पदपथावर चढली. डोळ्यांसमोर घडलेल्या दुर्घटनेने परिसरातील नागरिक, आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, बसचालक पूर्ण नशेत होता. नागरिकांनी त्याला बसमधून खाली ओढून चोप दिला.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.