पिंपरी, ता. १२ ः पिंपरी चिंचवड ते हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३१ वरील डांगे चौक ते चिंचवड पवना नदीपर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केप प्रकल्पांतर्गत विकसित केला जात आहे. यातील सुमारे ४०० मीटर लांबीचा सायकल ट्रॅक कमी करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थापत्य विभागाने घेतला आहे. डांगे चौकाजवळ थेरगावकडील समतल विलगकाची (ग्रेड सेपरेटर) लांबी वाढविण्याची गरज भासल्याने सायकल ट्रॅक कमी करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
आयटी पार्ककडे जात असल्याने हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बिर्ला रुग्णालय, डांगे चौक आणि भूमकर चौक मार्गे जाणाऱ्या या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. डांगे चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने समतल विलगक उभारला. या प्रकल्पामुळे चौकातील रोजची कोंडी बरीच कमी झाली असली तरी थेरगाव गावठाणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अडचणी निर्माण झाल्या. हिंजवडीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना थेरगावमध्ये प्रवेश करण्यासाठी चौक ओलांडून पुढे जाऊन उजवीकडे वळावे लागते. परिणामी, चिंचवडहून डांगे चौकाकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागतात.
थेरगाव गावठाणात जाणाऱ्या वाहनांना विनाअडथळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी डांगे चौकातील समतल विलगकाची लांबी १०० ते २०० मीटरने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणामुळे या प्रकल्पांतर्गत सुरू असलेली विकास कामे काही काळ रखडण्याची शक्यता आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅक विकसित केला जात आहे; मात्र समतल विलगकासाठी सायकल ट्रॅकची लांबी कमी करण्याचे ठरले आहे. मूळ निविदेत सायकल ट्रॅकचा खर्च समाविष्ट असल्याने आता तो निधी नेमका कुठे वापरला जाणार, हा प्रश्न आहे.
----------
सेवा रस्ते होणार अरुंद
हिंजवडीच्या दिशेने पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या आणि चिंचवडकडून पुणे किंवा हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा आजही डांगे चौकात लागतात. समतल विलगकाची लांबी आणखी २०० मीटरने वाढविण्यात आल्यास चौकाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्ते आणखी अरुंद होतील. या सेवा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना सायकल ट्रॅक आणि पदपथामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दोन्ही विकासकामे मूळ निविदेतून कमी करण्यात येत आहेत. या कामावर होणारा प्रस्तावित खर्च इतर प्रलंबित विकासकामांसाठी वळविण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
-------------
डांगे चौकातून थेरगावमध्ये जाणाऱ्या वाहनांना वळण घेताना कोंडीतून जावे लागते. चिंचवडकडून डांगे चौकाकडे जाणारी वाहतूक विस्कळित होऊन वाहनांच्या रांगा लागतात. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता डांगे चौकातील समतल विलगकाची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही लांबी वाढवल्यानंतर येथील अर्बन स्ट्रीट स्केप प्रकल्पाची कामे कमी करावी लागणार आहेत.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग, महापालिका
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.