पिंपरी, ता. १२ : रोटरी क्लब डायनॅमिक भोसरीतर्फे रोटरी समाजसभा जिल्हा मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. १४) रोजी करण्यात आले आहे. भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी आठ ते दुपारी अडीच या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे. सामाजिक बांधिलकी व विविध क्षेत्रातील जागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे माजी अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली. भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आयोजित या मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमास पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आशा स्वयंसेविका, परिचारिका, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, सीए, शेतकरी तसेच विविध सामाजिक व वित्त संस्थांसाठी तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण, वित्त व्यवस्थापन, सामाजिक विकास, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर कार्यशाळा होणार आहेत.