पिंपरी, ता. १७ : निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडूनच आचारसंहितेचा भंग होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग अंतर्गत असलेल्या संभाजीनगर प्रभाग क्रमांक १० मध्ये विविध ठिकाणी राजकीय नेत्यांचे अनधिकृत बॅनर व फ्लेक्स अजूनही झळकत असल्याचे दिसते. याबाबत मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक जाहीर होताच सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती, बॅनर, पोस्टर्स काढून टाकणे बंधनकारक असते. प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणी बरेच फ्लेक्स लावलेले आहेत. रस्त्याच्या कडेला, चौकात, विजेच्या खांबांवर तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागांवरही हे फ्लेक्स झळकत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, या भागातील मतदारांनी याबाबत उघड निषेध नोंदविला आहे. ‘आचारसंहिता सर्वांसाठी समान असायला हवी. सर्वसामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होते, मग राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरकडे प्रशासन डोळेझाक का करीत आहे,’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही होत आहे. अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या संबंधित नागरिकांवर तसेच हे बॅनर काढून टाकण्यात अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह (परवाना/आकाशफलक) विभागाच्या जबाबदार प्रमुख अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मतदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोग याबाबत कोणती भूमिका घेतो आणि प्रशासनाकडून तत्काळ कारवाई होते का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.