पिंपरी, ता. २४ ः आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात हालचालींना वेग आला आहे. पक्षाने शहरात आपली ताकद वाढवण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाला महापालिका निवडणुकीसाठी शहरात दोन युवा नेत्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या निवडीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षार्तंगत तसेच महाविकास आघाडीत बैठका सुरू झाल्या होत्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबतही स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पक्षाने निवडणुकीसाठी सतरा जणांच्या कोअर कमिटीची निवड करण्यात आली. गेल्या काही काळापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी हे दोन नेते आता मैदानात उतरणार आहेत. इच्छुकांची चाचपणी आणि सत्ताधारी पक्षाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यासाठी कोल्हे आणि पवार यांची जोडी रणनीती आखतील, पक्षाची संघटनात्मक बांधणी करतील अशी अपेक्षा पक्षातून व्यक्त केली जात आहे.
-----