पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड शहरात क्रीडा क्षेत्राचा विकास झाल्याचे चित्र महापालिका सातत्याने मांडत आहे. पण, प्रत्यक्षात जिम्नॅस्टिकसारख्या कौशल्याधिष्ठित खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खेळाडू आणि प्रशिक्षक करत आहेत.
खेळासाठी स्वतंत्र आणि मोफत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शहरातील जिम्नॅस्टिक संघटनांनी महापालिकेकडे सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्या वेळी प्रशासनाने जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र, जागेचा निर्णय अजूनही झालेला नाही. परिणामी, खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन यासारख्या खेळांसाठी मैदान, क्रीडासंकुले आणि सुविधा उभारल्या जात असताना जिम्नॅस्टिकसाठी मात्र कोणतीही सुविधा नाही. महापालिकेने आजवर जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉल, आवश्यक उपकरणे, प्रशिक्षित प्रशिक्षक किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे या खेळात करिअर घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे बहुतांश खेळाडूंना खासगी जिम्नॅस्टिक क्लासेसकडे धाव घ्यावी लागत आहे. शहरात मोजकेच खासगी क्लास उपलब्ध असून, त्यांचे शुल्क सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही. अनेक क्लास हे शहराबाहेर किंवा दूर अंतरावर असल्यामुळे खेळाडूंना रोज प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे.
जिम्नॅस्टिकमध्ये मुलांमध्ये प्रचंड क्षमता आणि आवड असतानाही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालकांना मुलांचे स्वप्न अर्धवट सोडावे लागत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील कुटुंबांसाठी खासगी क्लासचे शुल्क मोठे आव्हान ठरत आहे.
शहरातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना प्राथमिक सुविधा देण्यात होणारे अपयश ही गंभीर बाब असल्याचे क्रीडाप्रेमींनी नमूद केले आहे. जिम्नॅस्टिक संघटनांनी महापालिकेकडे तातडीने स्वतंत्र जागा, आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे आता शहरातील खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
महापालिका जागा शोधत असल्याचे सतत सांगण्यात येते. परंतु अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. या खेळांसाठी असलेले उपकरणे महागडी असतात. खेळाडूंना इजा पोहोचू नये, म्हणून नियमितपणे मार्गदर्शन आवश्यक असते. क्लासचे शुल्क मोठे असते. महापालिकेने मूलभूत सुविधा पुरविल्या तर खेळाडू तसेच पालकांची आर्थिक लूट थांबणार. त्यामुळे लवकराच लवकर जागा उपलब्ध करून द्यावी.
- हर्षद कुलकर्णी, प्रशिक्षक
निवडणुका असल्याने व्याप वाढला आहे. निवडणुका संपल्यानंतर महापालिका जिम्नॅस्टिक खेळासाठी स्वतंत्र हॉलची स्थापना करणार आहे. याबाबत वरिष्ठ सकारात्मक आहेत. काही दिवसांत शहरातील जागा निश्चित करून हॉलची उभारणी होईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.