तंव कर्मे ईशु भजावा
कर्मयोगानेच जगात अनेक उद्योग, व्यवसाय, सेवाभावी संस्था उभ्या राहिल्या. ज्याच्या लाभक्षेत्रात कोट्यवधी लोक येतात. अत्युच्च भाव धारण करून वाट्याला आलेली कर्म कर्तृत्वमद आणि कर्मफलाशा टाकून अत्यंत श्रध्देने पार पाडावीत. ती ईश्वरचरणी अर्पून त्याच्या कृपेला पात्र होऊन जीवन आनंदाने ओतप्रोत भरावे. आपणासहित संपूर्ण विश्वाला आनंदी करावे, हाच ज्ञानेश्वर माउलींचा कर्मयोगआहे.
- जगन्नाथ महाराज पाटील, श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय, सरळांबे- मुंबई
तया सर्वात्मका ईश्वरा ।
स्वकर्म कुसुमांची वीरा।
पूजा केली होय ।अपारातोषालागी॥ ज्ञानेश्वरी १८-९१७
तेजाने दिवे जसे व्यापलेले असतात, त्याप्रमाणे ज्याने हे सर्व जगत् आतबाहेर पूर्ण व्यापले आहे. त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता, ती त्याच्या अपार संतोषाला कारण होते.
वेगवेगळ्या कारणांनी कर्मापासून दूर चाललेल्या अनेक अर्जुनांना श्रीकृष्ण भाषेतली ही सर्वात्मकाची स्वकर्मपुष्पपूजा माउलींनी कृतीने, उपदेशाने शिकविली.
ज्ञानोबारायांचे डोळे ज्ञानाचे, हृदय भक्तीचे आणि हात-पाय कर्माचे आहेत. माउलींचा कर्ममार्गावर विशेष जीव आहे, म्हणूनच पसायदान मागताना
‘चला कल्पतरूंचे आरव।’ या वचनातून समाजकामना पूर्ण करणाऱ्या चालत्या कल्पतरुंच्या बागा, ही सज्जनाची कृतीशील आणि गतीशील प्रतिमा विश्वात्मक देवापुढे रेखाटली.
चरैवेति चरैवेति।
या पदाची ही मराठी आवृत्तीच होय.
माउलींनी ज्ञानेश्वरीत मांडलेली कर्मयोगाची भूमिका ही जगातील सर्वात परिपूर्ण, सांगोपांग, आदर्श, निर्दोष आणि स्पष्ट अशी आहे. ज्ञानेश्वरीतला कर्मयोग म्हणजे मागच्या प्रामाण्यांना वर्तमानातील अनुभवांसोबत घेऊन भविष्यासाठी केलेली निर्वाह योजना आहे.
कर्म हा ज्ञानोबारायांच्या केवळ भाष्याचा नसून तो त्यांच्या अनुष्ठानाचाही विषय आहे. वारकरी विचारांचा उभा राहिलेला निवारा गेली ७५० हून अधिक वर्षे भारतीय विश्वाला आश्रय देत आहे. त्याचा पाया उभारणीचा कर्मयोग माउलींचाच.
ज्ञानदेवे रचिला पाया ।
उभारिले देवालया ॥ संत बहिणाबाई
माउलींनी स्वतः कर्मयोग आचरलाच. परंतु सोबत्यांचा कर्मपरीघही विस्तीर्ण केला. रेड्याला बोलायला लावले. भिंतीला चालायला लावले. गीतेला लोकसुलभ होण्यास भाग पाडले. एकाकी उभ्या असलेल्या पांडुरंगाला लेकुरवाळा केले. केशीराजाच्या सेवेत असलेल्या संत नामदेव महाराजांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने सोबत घेऊन ‘ज्ञानदीप लावू जगी’, या संकल्पाची दीक्षा दिली. जगातल्या सर्व प्रकारच्या वर्गाला ‘हरि मुखे म्हणा’ असे म्हणत नामपाठाचा वस्तुपाठ असा ‘हरिपाठ’ हाती देत ‘जिव्हे वेगु करी।’ अशी आज्ञा केली.
स्वतः खांद्यावर गुढी घेऊन सुरू केलेली पंढरीची वारी आज सर्वोत्तम साधना म्हणून सर्वमान्य आहे.
माझे जीवीची आवडी ।
पंढरपूरा नेईन गुढी ।।
योग हा शब्द युज् या धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे. ज्ञानाच्या द्वारा देवाशी जोडणे म्हणजे ज्ञानयोग. भक्तीने देवाशी जोडले जाणे म्हणजे भक्तियोग. तसे कर्माच्याद्वारा देवाशी जोडले जाणे म्हणजे कर्मयोग होय.
जन्माला आल्यापासून शब्दांनी तत्त्ववेत्त्यांच्या मतांच्या रुपाने कर्मयोगाचा जागोजागी पुरस्कार केलेला सापडतो. या पुरस्काराने हातातले धनुष्य, मनातली वीरवृत्ती, कर्तव्याची स्मृती, अंगातले क्षात्रतेज या सर्वांचा अर्जुनाला पुनर्लाभ झाला.
सज्जन माणसांचा कर्मयोग हा समग्र पृथ्वीचा शृंगार असतो. फ्रेंच विचारवंत रोमा रोलॉं यांचे मत आहे की, जगात वाढलेली दुष्कर्मे ही दुर्जनांच्या सक्रीयतेचा नव्हे तर सज्जनांच्या निष्क्रीयतेचा परिणाम आहे.
जगाला दुख देणाऱ्या अनेक दुर्जनांच्या संकल्पाचा पराभव करण्याची ताकद एका सज्जनाच्या संकल्पात असते.
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक।।
म्हणूनच सज्जनांचे सक्रीय असणे हे जगताने आनंदाच्या बाबतीत निश्चिंत असावे, अशी ग्वाही आहे.
जगातल्या प्रत्येकासाठी कर्म ही वेदांची आज्ञा, देवाचा निरोप, संतांचे सांगणे, मोक्षाचे साधन, जीवनाची कृतार्थता, आयुष्याचे सार्थक आणि भाग्याचा उदय आहे.
कर्माची आवश्यकता समजून घेतली की अनुष्ठानबुद्धी येते.
१) कर्म टाकून आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नदीच्या पलीकडेच्या तीराला कसे जावे? असे संकट जेव्हा प्राप्त होते, तेव्हा नावेचा त्याग करावा, असे विधान योग्य नसते.
सांगे पैलतीरा जावे। ऐसे व्यसन कां जेथ पावे।
तेथ नावेते त्यजावे । घडे केवी।। ज्ञानेश्वरी ३/४७
तृप्ती अपेक्षित असेल तर स्वयंपाक न करता किंवा तयार असलेला न जेवता कसे शक्य आहे? तसे निरीच्छ स्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म करणे आहेच.
२) कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. आपण कर्म करायचे नाही असे ठरवले तरी जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, तोपर्यंत कर्मे घडणारच. आपली इच्छा असो वा नसो. धर्मद्वेषाने विहित कर्माचा त्याग केला तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट होत नाहीत. कान ऐकतीलच, डोळे बघतीलच, प्राणापानांचे व्यवहार बंद पडणार नाहीत.
देखे रथी आरुढिजे। मग जरी निश्चळ बैसिजे।
तरी चळ होऊनि हिंडिजे। परतंत्रा ।। ज्ञानेश्वरी ३/६६
रथात बसलेला मनुष्य निश्चळ होऊन बसला तरी रथाधीन झाल्यामुळे त्याला चंचल होऊन प्रवास घडतोच. किंवा वाळलेले पान स्वतः क्रियाशून्य असले तरी वाऱ्याच्या झपाट्यात सापडल्याने उचलले जाते. आकाशात इतस्ततः फिरते, तसे मी कर्म करणार नाही, म्हणणाराकडून घडतेच. शिल्लक राहतो तो फक्त त्यांचा आग्रह.
३) कर्मानुष्ठान आधिभौतिक लाभ घडवते. वाट्याला आलेल्या कर्तव्यकर्माच्या आचरणाने पुण्य होते व त्यायोगाने सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते.
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ।। ज्ञानेश्वरी ३/१०२
यारीतीने स्वधर्मानुष्ठाने आधिभौतिक उन्नती प्राप्त होते. आजही बाजारपेठांमध्ये जे उद्योजक आपल्या उत्पादनांची प्रामाणिकपणे गुणवत्तापूर्ण निर्मिती करत आहेत, त्यांच्या पाच-पाच पिढ्या धन-कीर्ती संपन्न बनलेली आपण पाहत आहोत. ज्याला अलिकडची पीढी ‘Brand’ म्हणून संबोधते.
४) कर्मानुष्ठान आधिदैविक लाभ घडवते. आधिदैविक सृष्टी आधिभौतिकापेक्षा सूक्ष्म, अतिंद्रिय व आधिभौतिकावर अनुग्रह करणारी आहे. जागतिक, दैहिक व्यवहार व्यवस्थित आणि सुखावह होण्याकरिता अपेक्षित असलेला दैवाशी संपर्क कर्मयोगाने साधतो.
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणा समस्ता।
योगक्षेम निश्चिता । करिती तुमचा।। ज्ञानेश्वरी ३/९६
म्हणून देवतासंतोषाकरिता कर्मयोगाचे अनुष्ठान आवश्यक आहे.
५) कर्मानुष्ठान आध्यात्मिक लाभ घडवते. ‘मी कर्ता आहे’ या अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी श्रवण-मनन-निदिध्यास इत्यादी घडाव्या लागणाऱ्या साधनाची पूर्वपीठिका असलेली चित्तशुद्धी निष्काम कर्मयोगाच्या यज्ञ, दान, तप, अनुष्ठानानेच मिळते.
तैसे निष्ठा केले कर्म। ते झाडी करूनि रजतम।
सत्वशुधीचे धाम । डोळा दावी ।। ज्ञानेश्वरी १८-१५८
क्षाराची पुटे दिल्यावर हिणकस सोन्यातले किडाळ जसे लवकर नाहीसे होते, तसे श्रद्धेने कर्म केले तर ते रज-तमांचा नाश करून डोळ्याला चित्तशुद्धीचे धाम दाखवते.
६) कर्मानुष्ठान मागच्यांनी केले आहे. ऐहिक-पारत्रिक कल्याण करून घेण्यासाठी पूर्वसूरींनी आचरलेला मार्ग अभ्यासला पाहिजे. योग्य अनुसरण म्हणजे अंधानुकरण नव्हे. यासाठी ज्ञानेश्वर महाराज सर्वोत्तम उदाहरणाची योजना करतात. पूर्णज्ञाते असलेल्या महाराज जनकांनी वर्णविहित कर्माचा त्याग न करता मोक्षसुखाला प्राप्त केले आहे.
देख पो जनकादिक। कर्मजात अशेख।
न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले।।
राम-कृष्णांचा हा कर्ममार्ग ही आपली कल्याणप्रद परंपरा आहे.
७) कर्मानुष्ठान पुढच्यांनी केले पाहिजे. चुकीच्या गोष्टींचा प्रवाह खंडित झाला पाहिजे. परंतु दिव्य बाबींची परंपरा बनली पाहिजे. कोणताही स्वार्थ, लाभ, प्राप्तव्य नसले तरी संस्कार म्हणून कर्मयोग आचरला पाहिजे. अन्यथा पुढच्या पीढीत ते ज्ञान पोहोचणार नाही.
एथ वडिल जे जे करिती । तया नाम धर्म ठेविती।
तेचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ ज्ञानेश्वरी १-१५८.
ज्येष्ठ श्रेष्ठांचे कर्म हा अनुयायांचा धर्म असतो.
८) कर्मानुष्ठान हा मोक्षाचा सुलभ मार्ग आहे.
देखे अनुक्रमाधारे। स्वधर्म जो आचरे।
तो मोक्ष तेणे व्यापारे। निश्चित पावे।। ज्ञानेश्वरी ३-१५८
मोक्षाचे आश्वासन हा कर्मयोगाचा सर्वोच्च सन्मान आहे. अशा कर्मयोगाची रीत समजून घेणे अत्यावश्यक आहे. कर्माची रीत चुकली तर कर्मयोग न घडता ते कर्मबंधन ठरते. सापाची सर्वांना भीती वाटते परंतु तो गारुडी त्याचे दोन विषदंत पाडून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो.
तसे कर्माचे दोन विषदंत आहेत. १) कर्तृत्वमद २) कर्मफलाशा
तैसा कतृत्वाचा मद। आणि कर्मफळाचा आस्वाद।
या दोहींचे नाव बंध। कर्माचा की ।। ज्ञानेश्वरी १८/२०५
या दोघांच्या निवृत्तीच्या दोन व्यवस्था आहेत.
कतृत्वमद घालवण्यासाठी देवसत्ता मान्य करावी.
तुझिया सत्तेने वेदासी बोलणे ।
सूर्यासी चालणे तुझिया बळे।।
माणसाची देव चालवी अहंता।
मीची एक कर्ता म्हणो नये।।
कर्मफलाशा घालवण्यासाठी दैवसत्ता मान्य करावी.
अन्न मान धन। हे तो प्रारब्धाधीन।।
व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥
अशा दिव्य कर्मयोगानेच जगात अनेक उद्योग, व्यवसाय, सेवाभावी संस्था उभ्या राहिल्या. ज्याच्या लाभक्षेत्रात कोट्यवधी लोक येतात. अत्युच्च भाव धारण करून वाट्याला आलेली कर्म कर्तृत्वमद आणि कर्मफलाशा टाकून अत्यंत श्रध्देने पार पाडावीत. ती ईश्वरचरणी अर्पून त्याच्या कृपेला पात्र होउन जीवन आनंदाने ओतप्रोत भरावे आणि आपणासहित संपूर्ण विश्वाला आनंदी करावे, हाच ज्ञानेश्वर माउलींचा कर्मयोग आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.