अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळित
त्रिवेणीनगरात पाइपलाइन फुटली ः लाखो लिटर पाण्याची नासाडी
पिंपरी, ता. ४ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनातील त्रुटींचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसला. गुरुवारी (ता. ३) सायंकाळी चारच्या सुमारास त्रिवेणीनगर भागात मुख्य पाइपलाइन अचानक फुटल्यामुळे निगडी, तळवडे, चिखली, कृष्णानगरसह सुमारे पाच ते सहा प्रभागातील लाखो नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागले. यामुळे गुरुवारीच नाही, तर शुक्रवारी देखील पाणी न मिळाल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. याच भागात वारंवार जलवाहिनी फुटत असल्यामुळे रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या कुचकामी व्यवस्थापनामुळे त्रिवेणीनगर, यमुनानगर, सेक्टर २२ निगडी येथे वारंवार पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडतात. निगडीतील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या पूर्वेकडील भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी ११०० आणि १२०० मिमि व्यासाच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईनद्वारे त्या-त्या भागातील जलकुभांत पाणी सोडून रहिवासी भागात वितरित केले जाते. त्रिवेणीनगर येथे या १२०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला ९०० मिमि व्यासाची पाइपलाइन जोडलेली आहे. ही पाइपलाइन गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. या पाइपलाइनवर अवलंबून असणाऱ्या अर्ध्या शहरातील नागरिकांना वेळेत पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे लाखो रहिवाशांची गैरसोय झाली.
या पाईपलाईनद्वारे कृष्णानगर येथील जलकुंभात पाणी भरून त्याचे चिखली, कृष्णानगर, त्रिवेणीनगर, तळवडे भागातील रहिवाशांना वितरण केले जाते. पुढे याच पाईपलाईनद्वारे आकुर्डी खंडोबामाळ येथील जलकुंभात पाणी भरून आकुर्डी परिसरात वितरित केले जाते. संभाजीनगर भागातील जलकुंभाद्वारे जाधववाडी, चिखलीच्या काही भागात पाणी सोडले जाते. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे या भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला. गुरुवारी आणि शुक्रवारी निगडीतील यमुनानगर, साईनाथनगर भागातील पाणी पुरवठा होऊ न शकल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. महापालिका पाणी पुरवठा विभागाने पाइपलाइन दुरुस्तीचे काम गुरुवारीच हाती घेतले. सायंकाळपर्यंत दुरुस्ती सुरुच होती. पुन्हा आज शुक्रवारी दिवसभर दुरुस्ती काम सुरु होते. दुपारी काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.
---------
चार दिवस मिळणार कमी दाबाने पाणी
त्रिवेणीनगर येथील फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस काम करण्यात आले. शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाइपलाइन भरून ट्रायल घेण्यात आली. या पाइपलाइनवर अवलंबून असणा-या त्या-त्या भागातील जलकुंभात पाणी भरुन वितरण प्रक्रिया राबविण्यात आली. तरी, पुढील शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारपर्यंत काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल. त्याचा परिणाम कृष्णानगर, मोरे वस्ती, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, संभाजीनगर, पूर्णानगर, घरकूल, चिखली, जाधववाडी भागात पडेल. वितरण व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर उच्च दाबाने पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रीतम बाविस्कर यांनी सांगितले.
--------
‘‘त्रिवेणीनगर येथे जड वाहनांची कायमच वर्दळ असते. दाब पडल्यामुळे ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडत असतील. यापूर्वीही या ठिकाणी अनेकदा पाइपलाइन फुटली आहे. शुक्रवारी (ता. ४) दुपारी पाइपलाइन दुरुस्त करून या भागातील सर्व जलकुंभात पाणी भरण्यास सुरवात केली. सर्व टाक्या भरून वितरण व्यवस्था कार्यान्वित केली. तरीही, पुरवठा सुरळीत होण्यास पुढील चार दिवसांचा कालावधी लागेल.
- जयकुमार गुजर, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय
फोटोः 28444
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.