पिंपरी, ता. ११ : ‘‘एखाद्या व्यक्तीकडून आपण काही तरी शिकतो. तो आपला गुरू. आपल्याकडील ज्ञान दुसऱ्यास देऊन आपण गुरू ऋणातून मुक्त झाले पाहिजे. गुरूपौर्णिमा हे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे,’’ असे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी.आर. माडगूळकर यांनी व्यक्त केले.
मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघा अंतर्गत चालणाऱ्या नवचैतन्य हास्य योग परिवार मोरवाडी, पिंपरी येथे माधवराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी चौधरी म्हणाले, ‘‘भारतात गुरूंची परंपरा फार मोठी आहे. महाभारतकार महर्षी व्यास, रामायणकार महर्षी वाल्मिकी हे आपले गुरू आहेत.’’ कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे म्हणाले, ‘‘आई, वडील आणि शिक्षक हे आपले पहिले गुरू आहेत. याप्रसंगी प्रज्ञा माडगुळकर यांनी गुरुशिष्याचे नाते अभंग असल्याचे सांगितले. हनुमंत गुब्याड यांनी आभार मानले. बी. एम. जाधव यांनी सूत्रसंचालन, उर्मिला केरुर यांनी नियोजन केले.