पिंपरी, ता. ११ : अखिल भारतीय कोंकणी परिषद आणि सिटी प्राइड स्कूल निगडी यांच्या विद्यमाने कोंकणी बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. सिटी प्राइड शाळेच्या प्रांगणात १३ जुलै रोजी हा मेळावा रंगणार आहे.
गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद चारी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून, या कार्यक्रमासाठी कोंकणी सांस्कृतिक अकादमीचे आयोजक मेल्विन रॉड्रिग्ज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमात रॉकी मिरांडा यांना ‘माधव मंजुनाथ शानभाग स्मृति जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच इसिडोर दंतास, वामन नायक, डॉ. अश्विनी कुलकर्णी, विजयानंद गायतोंडे आणि अल्फी मोंटेरो यांना कोंकणी भाषा आणि लोकांसाठी केलेल्या कार्यासाठी अखिल भारतीय कोंकणी परिषद तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ‘‘भारतीय कोंकणी-भाषिक लोकांमधील एकता’’ विषयावर चर्चा होणार आहे. संगीत सत्राच्या मालिकेने कार्यक्रमाची सांगता होईल, असे आयोजकांनी सांगितले.