पिंपरी : फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने बनावट डिमांड लेटर तयार केले. त्याद्वारे बँकेतून तब्बल ४८ लाखांचे कर्ज घेत फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घडला. प्रीतम प्रफुल्ल वेलणकर (रा. सेक्टर २१, प्लॉट नं. १५३, निगडी प्राधिकरण, पुणे) आणि सुषमा महादेव माने (रा. माळवाले नगर, किवळे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अतुलकुमार लाल वीरेंद्र विक्रम सिंग (रा. निलगिरी लेन, नालंदा अपार्टमेंट, औंध, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वेलणकर याने नीलेश पाटील यांच्या मालकीच्या श्रुती प्राइड इमारतीमधील दोन फ्लॅट साठ लाखाला विकत घेण्याचा ठराव केला. त्यानुसार फ्लॅटचे वीस टक्के रोख रक्कम व इतर पैसे कर्ज स्वरूपात करून देण्याचे ठरले. त्यानुसार वेलणकर याने नीलेश पाटील यांच्याशी ॲग्रिमेंट टू सेल करारनामा केला. या करारनाम्याचा वापर करून वेलणकर याने फ्लॅट खरेदीसाठी फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडिया येथे ४८ लाखाच्या कर्जासाठी अर्ज केला. अर्जासोबत श्रुती प्राइड नावाची बांधकाम साइट नावाचे बनावट डिमांड लेटर तयार करून त्यावर प्रोप्रायटर म्हणून बनावट सही करून कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची ४८ लाखांची रक्कम बँक ऑफ इंडिया, पिंपरी शाखेतून सुषमा माने यांच्या सेवा विकास बँक खात्यात ट्रान्स्फर करून बँकेची फसवणूक केली.
रहाटणीत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : दुचाकीवरून कामावर निघालेल्या तरुणाला रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रहाटणी येथे घडली. तुषार राजू पुलावळे (वय २१, रा. एकता हाउसिंग सोसायटी, थेरगाव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निवतन मगर (वय १८, रा. थेरगाव, पुणे) आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तुषार हे दुकानात कामावर जात असताना रहाटणी येथे आरोपींनी त्यांना थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करीत गंभीर जखमी केले. आरोपींच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काळेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान घडली. रचित उमेश शिंदे (वय २३, रा. उत्कर्षनगर, भांडूप वेस्ट, मुंबई) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जागेश खुमान लाल (वय ३६, रा. बिरदवडी, चाकण, मूळ रा. ललितपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. रचित शिंदे हे दुचाकीवरून जात असताना कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान आले असता आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने रचित यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात रचित हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भोसरीतील बैलगाडा घाट येथे करण्यात आली. अविनाश महादेव जाधव (वय २८, रा. शिवसेना चौक, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरीतील बैलगाडा घाटाजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून २१ हजार रुपये किंमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.
गॅसचा काळाबाजार; पाच जणांना अटक
पिंपरी : बेकायदारित्या घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करून काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी येथील साखरे वस्ती येथे करण्यात आली. धर्मपाल जगदीश बिश्नोई (वय २३, रा. पाखरे वस्ती, हिंजवडी), अशोक बाबूराव सूर्यवंशी (वय ३२, रा. जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर), अशोक ओमप्रकाश खिलारी (वय २४, रा. साखरे वस्ती, हिंजवडी), बाळू बापू हजारे (वय २५, रा. सरकार चौक, मारुंजी, मूळ- अहिल्यानगर), ओमप्रकाश सोहनलाल खिल्लेरी (वय ४५, रा. पारखे वस्ती, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे घरगुती गॅस सिलिंडरमधून धोकादायकरीत्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्स्फर करीत असताना मिळून आले. त्यानंतर आरोपी त्या गॅस टाक्यांची चढ्या दराने विक्री करायचे. आरोपींकडून २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.