काळेवाडी, ता. १६ : काळेवाडी, रहाटणी परिसरातील विविध भागांत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस व खासगी सुरक्षा रक्षकांच्याकडून देण्यात येणारी रात्रीची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात आले असताना देखील काही भाग अजूनही पोलिसांच्या नजरेबाहेर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काळेवाडी, रहाटणी परिसर नव्याने विकसित होत असून महत्वाचा शहरातील भाग असून आहे. येथे वाकड, सांगवी, पिंपरी आणि चिंचवड पोलिस ठाण्यांच्या हद्द जोडल्या जातात. स्वतंत्र काळेवाडी पोलिस ठाणे झाल्यानंतर परिसरास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी परिसराला मिळाले आहेत. मात्र काळेवाडी भागातील वाढती गुन्हेगारी व चोरीच्या घटना तसेच अवैध धंद्यांसारख्या अनेक गोष्टी पोलिस प्रशासनाची डोकेदुखी ठरल्या आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवत असताना सर्वसामान्य नागरिक रात्रीची झोप ज्या सुरक्षेच्या भरवशावर घेत आहेत; ती सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. काळेवाडी परिसरातील तापकीर मळा व नदीकाठचा परिसर अतिशय शांततेचा व एकांत असलेला परिसर आहे. त्याचप्रमाणे नव्याने ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या बीआरटीएस रस्त्याची परिस्थितीही त्या सारखीच असून सत्संग रोड, विजयनगरचा पाठीमागील भाग हा एकांत व शांततेचा असल्याने या भागात रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्याची गरज दिसून येत आहे.
बॅरिकेड्स लावून तपासणी
पोलिस प्रशासनाकडून काळेवाडीतून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच बॅरिकेड्स लावून तपासणी सुरू असते. हीच तपासणी तापकीर मळा ते पिंपरी रस्ता व तसेच विजयनगरच्या मागील भागात असणे गरजेचे असून त्या भागातही बंदोबस्त वाढवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. उच्चभ्रू सोसायट्यांच्या विजयनगरच्या पाठीमागील भागात व्यावसायिक व महत्त्वाच्या व्यक्ती वास्तव्य करतात. त्यामुळे या भागातील पोलिस गस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
काय करायला हवे ?
- नागरिकांनी रात्रीच्यावेळी पोलिसांना सहकार्य करणे
- सोसायट्यांमध्ये खासगी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे
- ज्येष्ठ नागरिकाऐवजी तरुण, शारीरिक सक्षम अश्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक
पोलिस चौकीची मागणी
अनेक ठिकाणी कमी पगारावर काम करण्यासाठी तयार असणाऱ्या व गरजू ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा रक्षक म्हणून प्रवेशद्वारावर ठेवल्याने सुरक्षेच्यादृष्टीने अनेक गोष्टी नजरेआड होत आहे. त्याची जाणीव त्यांना होत नसल्याने अनेक घटनांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या भागात नवीन पोलिस चौकीची मागणी केली असून यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे विनंती अर्ज केले आहेत.
काळेवाडी परिसरातील अनेक भाग हा पोलिसांच्या बंदोबस्त व निगराणीच्या बाहेर असल्याचे दिसून येते. या भागातील गस्तही नियमित नसल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. त्यासाठी आता नव्याने झालेल्या काळेवाडी पोलिस ठाण्याकडून ती अपेक्षा असून स्थानिक बंदोबस्तात वाढ करण्यात यावी. सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
- सुरेश भालेराव, रहिवासी
नियमित मोबाईल व्हॅन, मार्शल व इतर कर्मचारी फिरतीवर असतात. त्याचप्रमाणे नियमित मॉकड्रिल व इतर नियोजनही करण्यात येत असते. बॅरिकेड्स लावून विविध भागांत वाहनांची तपासणी व रात्रीच्यावेळीचे नियोजन हे आयुक्तालयाच्या सूचनेनुसार व स्थानिक ठाण्याच्या अंतर्गत केले जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने परिसर मोठा असून त्यासाठी जलद वाहने, मोबाईल व इतर माध्यमांची ही मदत घेतली जाते.
- राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेवाडी पोलिस ठाणे
काळेवाडी पोलिसांचे ‘बळ’
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक - १
- पोलिस अधिकारी संख्या ः १०
- पोलिस कर्मचारी संख्या ः ६०
PNE25V31838, PNE25V31835
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.