वाकड, ता. १६ ः चिंचवड-डांगे चौक-हिंजवडी रस्त्याच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी महापालिकेने वाकड काळाखडक परिसरात बुधवारी (ता. १६) पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. यात ४६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील ४० दुकाने आणि ५६ घरे जमीनदोस्त केली. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
काळाखडक परिसरातील रस्ता रुंदीकरण गेल्या काही वर्षांपासून रखडले होते. झोपडपट्टी रहिवाशांनी अनेक दुकाने, घरांचे रस्त्यात अतिक्रमणे केली होती. महापालिकेने यापूर्वी अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटीसही बजावल्या होत्या. तरीही अतिक्रमणे हटत नसल्याने बुधवारी सकाळी सात वाजताच आठ बुलडोझर, दहा डंपर, एक पोकलेन आणि शंभर मजुरांच्या साह्याने महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. रस्त्यासाठी अडथळा ठरणारे २५० मीटर लांब व १६ मीटर रुंदीपर्यंतची दुकाने, घरे, टपऱ्या हटविल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापू गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, अमित पंडित, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, शिवाजी पवार, कार्यकारी अभियंते राजेंद्र शिंदे, सुनील पवार, अभिमान भोसले, दिलीप लांडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, सतीश कसबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोनशे पोलिस कर्मचारी व एमएसएफच्या दोन तुकड्या असा फौजफाटा तैनात होता.
‘सकाळ’ने वेधले होते लक्ष
चिंचवड-हिंजवडी रस्त्यावर वाकड येथील काळाखडक ते भुमकर चौक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. या बाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शनिवारीही (ता. १२) ‘डांगे चौक-हिंजवडी रस्त्याचा श्वास अडकला’ असे वृत्त प्रसिद्ध करून ‘सकाळ’ने वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर नोटीस देऊन महापालिकेने बुधवारी धडक कारवाई केली.
स्वेच्छेने काढली अतिक्रमणे
मंगळवारी (ता. १५) सायंकाळी महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांची भेट घेऊन कारवाई होणार असून, स्थलांतर करण्याच्या सूचना रहिवाशांना दिल्या होत्या. त्यामुळे बुधवारी पहाटेपर्यंत बहुतेकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे काढून साहित्य इतरत्र हलविले होते.
किवळेत स्थलांतर...
काळाखडक झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. त्यासाठी झोपडीधारकांचे तात्पुरत्या स्वरूपात किवळे येथे स्थलांतर केले आहे. त्यासाठी संक्रमण शिबिर राबविले. त्यात रस्ता बाधितांना स्थलांतरित करून त्यांच्या निवासाची सोय करून कारवाईचे नियोजन केले आहे.
१८ मीटर डीपी रस्ता प्रस्तावित
काळाखडक येथे १८ मीटर रुंद डीपी रस्ताही प्रस्तावित आहे. त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे, असे सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी सांगितले. डीपी रस्त्याने बाधित होणाऱ्यांनी स्वतः बांधकामे काढून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पन्नास वर्षांपूर्वीची वस्ती
राज्यात १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी वेगवेगळ्या भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी काळाखडक परिसरात झोपड्या उभारल्या व राहू लागले. त्यानंतरही स्थलांतरित येतच राहिले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला झोपड्या, टपऱ्या, दुकाने वाढली. अघोषित असल्याने काळाखडक कायमच दुर्लक्षित राहिले.
‘एसआरए’ प्रकल्पाचे काय?
गेल्यावर्षी काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला (एसआरए) मान्यता मिळाली आहे. त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पात्र लाभार्थींचे किवळेतील संक्रमण शिबिरात तात्पुरते पुनर्वसन (स्थलांतर) केले आहे. रस्ता बाधितांनाही तिथे हलविले आहे.
बुधवारची कारवाई केवळ रस्त्यात अतिक्रमण करणाऱ्यांवर झाली. स्थलांतरित न झालेल्यांवर लवकरच कारवाई होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरू केली आहे. शहरामध्ये विकासाच्या दृष्टिने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामाचे तत्काळ निष्कासन करण्याचा आदेश संबंधित विभागांना दिला आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
वाकड येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील सर्वच क्षेत्रीय कार्यालयातील अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याबाबत आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने बैठकही घेतली आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
----
‘आयटी’ला मिळणार जलद ‘कनेक्टिव्हिटी’
डांगे चौक-हिंजवडी रस्ता रुंदीकरणाचा परिणाम; कोंडीमुक्त सुरक्षित प्रवास होणार
बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड ः आयटी पार्ककडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी चिंचवड-डांगे चौक-भुमकर चौक- हिंजवडी हा प्रमुख रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल. महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन हा रस्ता करत आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशातील प्रमुख आयटी केंद्रांपैकी हिंजवडी एक आहे. येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना आयटीकडे नेणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरून दररोज लाखो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी प्रवास करतात. शिवाय, वाकड, ताथवडे, हिंजवडी, मारुंजी परिसरात मोठमोठे शैक्षणिक संकुले आहेत. सध्याच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय यासारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे या समस्यांवर मात करता येणार आहे.
रस्ता रुंदीकरणाचे फायदे
- वाहतूक कोंडीतून मुक्तता : डांगे चौक ते हिंजवडी रस्ता आयटी हबशी जोडणारा प्रमुख मार्ग आहे. सध्या या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांची क्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल
- प्रवासात सुलभता ः रुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळेल. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी, ज्यांना रोजच्या प्रवासात अडथळ्यांचा सामना करावा लागतो, त्यांना याचा थेट फायदा होईल.
- आर्थिक विकास ः सध्याच्या रस्त्यांसह सुधारित व प्रस्तावित रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील व्यवसायांना चालना मिळेल. नवीन उद्योग, दुकाने आणि निवासी प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.
- सार्वजनिक वाहतूक सुधारणा ः अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. मात्र, हे रस्ते रुंद झाल्यास पीएमपी या सार्वजनिक वाहतूक सेवेची अधिक कार्यक्षमता वाढेल. भविष्यात मेट्रोला कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल.
- कनेक्टिव्हिटी वाढणार ः रुंद रस्ता आणि प्रस्तावित चारपदरी उड्डाणपूल हिंजवडी आयटी पार्कला पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे, औंध, बाणेर, काळेवाडी, थेरगाव आणि पिंपरी-चिंचवडशी जोडेल. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल.
- अधिक जलद व सुरक्षित प्रवास ः रस्ता रुंदीकरणासोबतच पर्यायी मार्ग आणि उपरस्त्यांचे नियोजन केले जात आहे. ज्यामुळे वाहतुकीचे विकेंद्रीकरण होईल आणि मुख्य रस्त्यावरील ताण कमी होईल. हा रस्ता पुणे-मुंबई महामार्गाशी जोडला गेल्याने, रुंदीकरणामुळे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल.
कारवाई होणार नसल्याची अफवा
रस्त्यातील अतिक्रमणावर होणारी कारवाई थांबवावी यासाठी काळाखडकच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी तीन महिने ही कारवाई होणार नसल्याचे रहिवाशांना सांगितले. परिणामी, तीन महिने कारवाई होणार नसल्याची अफवा पसरल्याने अनेक रहिवासी गाफील होते. मात्र, मंगळवारी महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन कारवाईची सूचना दिल्याने अनेकांनी स्वेच्छेने साहित्य इतरत्र हलवून कारवाईला सहकार्य केले. तर बुधवारी होणाऱ्या कारवाईला संभाव्य विरोध गृहीत धरून गुन्हे शाखेने काही कार्यकर्त्यांची धरपकड केली.
काळाखडक रहिवासी म्हणतात...
रस्त्यातील सर्वांना अनेकदा महापालिकेने नोटीस दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमण न काढल्याने आजच्या कारवाईत माझे दोन घरे गेली आहेत. ती घरे जाण्यापूर्वीच आमचे किवळे येथील संक्रमण शिबिरात पुनर्वसनाची व्यवस्था केली आहे. एसआरए प्रकल्पात दोन घरे मिळणार आहेत.
- शुभम लोंढे
कारवाई होणार असल्याची नोटीस आम्हाला मिळाल्याने आम्ही सर्व साहित्य शिफ्ट केले होते. फक्त घराचे व दुकानाचे बांधकाम साहित्य काढायला आम्हाला वेळ मिळाला नाही. येथे एसआरए प्रकल्प साकारणाऱ्या विकसकाने आमचे रस्त्यात गेलेले घर व दुकान देणार असल्याची लेखी हमी दिल्याने चिंता मिटली आहे.
- नंदू जाधव
विकासकामांना सहकार्य असल्याने आम्ही कारवाईला विरोध केला नाही. मात्र, स्वतःच्या स्वार्थापोटी काही मतलबी, तथाकथित पुढाऱ्यांनी कारवाई होणार नसल्याचा गैरसमज पसरवला. रस्त्यात बाधित झालेल्या प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला घर देण्याची जबाबदारी विकसक व शासनाने घ्यावी. आम्हीही सर्वतोपरी सहकार्य करू.
- लता जैन
---
मुख्य फोटो ः 31879
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.