अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम (आईटीएमएस) यंत्रणा बसविली. त्यास येत्या शुक्रवारी एक वर्ष होत आहे. या कालावधीत बेदरकार चालकांनी वाहतूक नियमांचे केल्याबद्दल २७ लाख ७६ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यातून ४७० कोटींचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ५१ कोटी ३२ लाखांचा दंड वसूल झाला.
सहापदरी द्रुतगती मार्ग ९४.५ किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई-पुण्याशिवाय साताऱ्यापासून कोकणात आणि पुढे बंगळूरला जाण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. यावरून दररोज एक लाखांहून जास्त वाहने प्रवास करतात. वाढते अपघात रोखण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली. मार्गावरील महत्त्वाच्या तसेच अपघातप्रवण असलेल्या ५२ ठिकाणी कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित यंत्रणा बसविण्यात आली. यात अत्याधुनिक ३३७ कॅमेरे आणि रडारचा समावेश आहे. याशिवाय ‘वेट इन मोशन’ यंत्रणाही याचा एक भाग आहे. यात वाहन रस्त्यावरून धावत असले तरी त्यात भरलेल्या मालाचे वजन मोजता येते. त्यामुळे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल असल्याचे स्पष्ट होते.
वाहनांवर निगराणीसाठी लोणावळा येथील कुसगावमध्ये ‘कमांड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘आरटीओ’चे अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी तैनात आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि पनवेल येथील मोटर वाहन निरीक्षकांमार्फत १८ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते.
-----------
हे नियम मोडल्यास कारवाई
- वाहन भरधाव चालविणे
- मार्गिका अचानक बदलणे
- ‘सीटबेल्ट’ न लावणे
- नो-पार्किंग
- चुकीच्या मार्गिकेतून प्रवेश
- वाहन चुकीच्या बाजूने चालवणे
- बोगद्यात वाहन थांबविणे
- वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे
- अवजड वाहन उजव्या मार्गिकेतून चालविणे
------
सहा महिन्यांतच १०० अपघात
अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होऊनही अपघातांची संख्या कमी होत नाही. यावर्षी जानेवारी ते जून सहा महिन्यांतच १०० अपघात झालेत. यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६२ जण गंभीर आणि ५३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटली असली तरी अजूनही अपघातांचे प्रमाण मात्र जास्तच असल्याचे दिसून येते.
------
द्रुतगती महामार्गावरील अपघात
वर्ष - एकूण अपघात - मृत्यू - गंभीर जखमी - किरकोळ जखमी
२०२१ - २०० - ८८ - १४६ - १८
२०२२ - १९८ - ९२ - १४४ - ३३
२०२३ - १५४ - ६५ - ८९ - ३२
२०२४ - १९१ - ९० - १४३ - ६५
जानेवारी ते जून २०२५ - १०० - ३० - ६२ - ५३
-----------
नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार - वाहनांची संख्या (लाखात)
- भरधाव वेगात वाहन चालविणे - १२.२१
- ‘सीटबेल्ट’ न लावणे (प्रवासी) - ६.६२
- ‘सीटबेल्ट’ न लावणे (चालक) - २.७३
- चुकीची मार्गिका - ४.९
-------
वाहनांचा प्रकार - कारवाई
कार - १७,२०,८१६
मालवाहतूक वाहने - ५,३३,४४२
बस - २,६७,५२४
कॅब - २,००,५८८
कृषिवाहने - ३०,४५०
दुचाकी - १३,८२३
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.