पिंपरी ः भुकूम येथे एका टोळक्याने दुकानदाराला खंडणी मागत मारहाण केली. ही घटना बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. या प्रकरणी गोविंद यादव (वय ४५, रा. भुकूम) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युसुफ समीर शेख (वय २४, रा. पिरंगुट, पुणे), ऋषिकेश देविदास कांबळे (वय २१, रा. पिरंगुट, पुणे), कृष्णा उर्फ पिल्या निवृत्ती कांबळे (वय १९, रा. लवळे फाटा, पुणे), प्रज्वल चिदानंद मुदळ (व १९, रा. लवळे फाटा, पुणे), कालीचरण ठाकूर, गोट्या भाई, साहिल सांगळे आणि इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात येऊन ‘इथे दुकान चालू ठेवायचे असेल तर पाच लाख रुपये आणि महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी धमकी दिली. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. आरोपीतील एकाने फिर्यादीच्या खांद्यावर तर दुसऱ्याने फिर्यादीच्या मुलाच्या मांडीवर चाकूने वार केले. आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि पासवर्ड घेऊन गुगल पे व फोन पे व खिशातून एकूण एक लाख चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. युसुफ, ऋषिकेश, कृष्णा, प्रज्वल यांना अटक करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यानेच कंपनीतून मोबाईल चोरले
पिंपरी ः पुनावळे येथील सायप्रो सोसायटीमधील १० मिनिट्स स्टोअर कंपनीत दोन मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी १५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश रतिलाल शहा (वय ६४, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शैलेश कैलाश गिरी (रा. गेवराई, बीड) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी हे इंस्टाकार्ड सर्व्हिसेस लिमिटेड या खासगी कंपनीत इन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीचे ८९ हजार ९८९ रुपये किमतीचे दोन मोबाईल कंपनीच्या परवानगीशिवाय चोरले. रावेत पोलिस तपास करीत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला
पिंपरी ः जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर चाकू हल्ला केला. ही घटना पिंपरी येथील डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज, फुलेनगरजवळ सोमवारी रात्री घडली. विश्वकुमार मधुकर गायकवाड (वय २६, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी स्वनिल बसवराज माशळकर (पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र विशाल मुनीलाल राजभर हे डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील त्यांची वॉर्डबॉयची ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या गेटसमोर एक व्यक्ती मोटारसायकलवरून घसरून पडला. त्याला पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मित्र थांबले असता, फिर्यादीच्या ओळखीचा आरोपी तिथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि कमरेला असलेला चाकू फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी ः किन्हई गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारील सीओडीच्या मोकळ्या मैदानात एका तरुणाला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री करण्यात आली. रितेश प्रभाकर समकारे (वय १९, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रितेश याने गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता जवळ बाळगला होता. खंडणीविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.
धक्क लागल्याचे कारण; अल्पवयीन मुलाकडून दारूच्या बाटलीने हल्ला
पिंपरी ः रस्त्याने जाताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर अल्पवयीन मुलाने दारूच्या बाटलीने हल्ला केला. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी निगडी येथील अण्णा भाऊ साठे कमानीजवळ घडली. अनिल रवींद्र शिनगारे (वय ३५, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल हे चिकन चौक, निगडी येथे जात होते. रस्त्यात काही मुले बोलत थांबली होती. त्यावेळी अनिल यांचा एकास धक्का लागला. त्या रागातून एका अल्पवयीन मुलाने अनिल यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या हातातील दारुची काचेची बाटली फिर्यादीच्या तोंडावर मारली. त्यामुळे फिर्यादीच्या डोळ्याखाली गालावर, ओठाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.