पिंपरी, ता. २५ ः तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमता (एआय), ड्रोनसारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने महत्त्वाच्या भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य संधी ः कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान’ या विषयावर निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात आयोजित परिसंवादात आयुक्त सिंह बोलत होते. नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील वाढत्या गरजांसाठी योग्य कौशल्य विकास आणि सहकार्याच्या माध्यमातून पूरक उपाय तयार करणे या उद्देशाने परिसंवाद आयोजित केला होता. युवकांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीत एकही युवक मागे राहू नये, यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवण्यास प्रयत्नशील असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. संस्थेच्या अध्यक्षा व सहसंस्थापक रुची माथूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर, महापालिका उपायुक्त ममता शिंदे आदी उपस्थित होते. लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या लाइटहाऊस प्रोग्राम संचालिका दीपिका केडिया यांनी सूत्रसंचालन केले.
मार्गदर्शकाचे बोल...
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर ः युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीशी सुसंगत करण्याची तातडीची आहे.
संस्थेचे सहसंस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन ः २०२७ पर्यंत भारताला १२.५ लाख कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांची, दरवर्षी एक लाख प्रमाणित ड्रोन ऑपरेटर आणि जवळपास १० लाख सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. ऑटोमेशनमुळे ३० टक्के एंट्री लेव्हल आयटी नोकऱ्यांवर परिणाम होणार असला, तरी एआय आधारित भूमिकांमध्ये १.६ पट वाढ होत आहे. दहावी उत्तीर्ण युवकांसाठी डेटा अॅनोटेशन आणि ड्रोन पायलटिंगसारख्या संधी निर्माण होत असून, पदवीधरांसाठी डेटा अॅनालिस्ट व ड्रोन टेक्निशियनसारखी नवीन पदे खुली होत आहेत.
परिसंवादात चर्चा
युवकांच्या संदर्भात ‘उदयोन्मुख नोकरी संधी व आवश्यक कौशल्ये’ विषयावर परिसंवाद चर्चा झाली. त्यात मानस अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थापक अनुप तांबे, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डॉ. विशाल वडजकर, फ्लायजेन सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य वधोकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे बिझनेस ऑपरेशन्स विभाग संचालक राजेश खन्ना यांनी सहभाग घेतला. ‘युवकांसाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकासाचे मार्ग निर्माण’ विषयावर गटचर्चा झाली. औद्योगिक तज्ज्ञ अनिर्बान मुखर्जी, पृथजित बॉबी लाहिरी, रुपा रॉय यांनी युवकांसाठी उदयोन्मुख नोकरी संधी, जिज्ञासेवर आधारित शिक्षणाची गरज, स्वयं-अभ्यास प्लॅटफॉर्म्स आणि एआय व ड्रोन तंत्रज्ञानातील प्रारंभिक भूमिकांबाबत विचार मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.