जादा परताव्याच्या आमिषातून ५२ लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाइन पद्धतीने घडली. या प्रकरणी महिलेने बावधन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रितिका देवी आणि तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला जास्त नफ्याचे आमिष दाखवत झिरोदा ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला चांगला परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर ४७ लाख ३८ हजार ९३३ रुपये गुंतवण्यास भाग पाडले आणि आभासी खात्यावर मोठा फायदा झाल्याचे दर्शवले. फिर्यादीने ही रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना जमा रकमेवर पाच लाख रुपये कर भरण्यास भाग पाडले. यानंतरही परतावा दिला नाही.
दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याने मारहाण
पिंपरी : दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका व्यक्तीला बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना भुकूम येथे घडली. याप्रकरणी अविनाश संतू जांभूळकर (रा. यशदीप चौक, वारजे माळवाडी) यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंट्या आणि त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. जांभुळकर हे हिंजवडी फेज-तीन येथून देवदर्शन घेऊन घरी जात असताना रस्त्यामध्ये फिर्यादीस एक अनोळखी दुचाकी ओव्हरटेक करून जात होती. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास ‘‘भाऊ, दुचाकी हळू चालव’’ असे सांगितले. त्याच रागातून आरोपींनी भूकूम येथे फिर्यादीची गाडी अडवली आणि मारहाण केली.
लग्नाच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक
पिंपरी : एका संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. महिलेच्या क्रेडिट कार्ड, लोन ॲप आणि बँक ॲप द्वारे पैसे घेत १९ लाख ८१ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पीडित महिलेने शिरगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राकेश शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेची शेट्टी याच्यासोबत एका संकेतस्थळावरून ओळख झाली. शेट्टी याने महिलेला मेसेज आणि फोन करून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेसोबत लग्न करणार असल्याचे भासवून आरोपीने महिलेच्या क्रेडिट कार्ड, लोन ॲप आणि बँकेच्या ॲपद्वारे पैसे घेतले. त्यानंतर लग्न न करता फसवणूक केली.
दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
पिंपरी : दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई शिरगाव येथे नदी काठी करण्यात आली. यातील आरोपी महिलेने शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नदीच्या काठावर दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर रसायन नष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.