पिंपरी, ता. २६ : पिंपरी-चिंचवड शहरातील तालेरा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद््घाटन होऊन पाच महिने उलटले तरी अनेक सुविधांचा अभाव आहे. परिणामी गरजू रुग्णांना एक तर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अन्यथा खासगी रुग्णालयांत जाणे भाग पडते. यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना शारीरिक त्रास आणि आर्थिक मनस्ताप होत आहे.
या रुग्णालयात अनेक अत्यावश्यक आरोग्य सुविधांची अद्याप प्रतिक्षाच आहे. रुग्णालयाच्या नव्याने बांधलेल्या बहुमजली इमारतीचे ६ फेब्रुवारी रोजी उद््घाटन झाले. त्यानंतर दोन दिवसांत जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत सर्व साहित्य हलविण्यात आले. उद््घाटनाच्यावेळी २५० खाटा, बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) तसेच इतर अनेक सुविधांनी रुग्णालय सुसज्ज असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या सेवा-सुविधा अद्याप कागदावरच आहेत.
मात्र, पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही या सेवा सुरू झाल्या नाहीत. हे संपूर्ण व्यवस्थापनातील दिरंगाईचे स्पष्ट लक्षण असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णांची परवड
रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्यामुळे सामान्य व गरजू रुग्णांची परवड होत आहे. ‘वायसीएम’मध्ये अनेक वेळा खाट उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक गंभीर रुग्ण अत्यवस्थ होतात.
पालिकेच्या नियोजनाचा अभाव
महापालिकेकडून उद््घाटनाचा गाजावाजा केला. प्रत्यक्षात सुविधा देण्यासाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका, यंत्रसामग्री व त्यासाठीची मंजुरी याचा विचारच न केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे रुग्णालयात फक्त बाह्यरुग्ण सेवा सुरू आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी अत्यावश्यक विभाग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयासाठी डॉक्टरांची भरती आणि यंत्रसामग्री उपलब्ध करावी, अशी मागणीही होत आहे.
नागरिकांच्या आशा कायम
हे रुग्णालय पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाला सुविधा सुरू करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावे लागतील. केवळ उद््घाटन करून डोळ्यात धूळफेक करण्यात अर्थ नाही. अत्यावश्यक सेवांशिवाय रुग्णांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
---
सध्याची स्थिती
फक्त हे विभाग सक्रिय ः स्त्रीरोग, दंत चिकित्सा, बालरोग, सामान्य औषधोपचार
- केवळ ५० खाटा
- रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाण
---
- प्रस्तावित सेवा
या विभागांची पूर्तता नाही ः शस्त्रक्रिया, अतिदक्षता (आयसीयू), नवजात शिशू अतिदक्षता (एनआयसीयू), बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू), डायलिसिस
---
निष्कर्ष
तालेरा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. सध्याची अंमलबजावणी आणि कामाच्या संथ गतीने उत्साहाचे आता नाराजीत रूपांतर झाले आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
..
रुग्णालयाची नवी इमारत बांधण्यात आल्याने बऱ्याच अपेक्षा होत्या. सध्या मात्र फक्त नावापुरतेच रुग्णालय सुरू आहे. अतिदक्षता विभाग नाही, शस्त्रक्रिया होत नाहीत, मग नुसती नवी इमारत बांधून काय उपयोग?
- अतुल पडवळ, चिंचवड
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.