मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २७ ः महिलांसाठी गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं. सणवार असो की एखादा आनंद सोहळा, अशा कार्यक्रमांसाठी अलीकडे प्रत्येक महिला मोठ्या अभिमानाने वेगवेगळ्या डिझाईनची मंगळसूत्र घालून जातात. सध्या हेच दागिने चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत. सणवारांच्या काळात शहराच्या अनेक भागांत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याचे दिसते. आता श्रावणाबरोबरच मंगळागौरीसह वेगवेगळे सोहळे होणार असल्याने भगिनींना सौभाग्याचं लेणं सांभाळावे लागेल.
शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांत महिलांचा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला. श्रावणानंतर गणपती, नवरात्र, त्यानंतर दिवाळी आणि मग लग्नसराईचे दिवस येतील. त्यामुळे एक तर दागिने घालून एकटीने बाहेर पडू नये किंवा दागिने घातलेच तर कमाल खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
एकट्या महिलेला चोरटे ‘टार्गेट’ करीत आहेत. पादचारी महिलांचे दागिने दुचाकीवरून आलेले चोरटे काही क्षणांत हिसकावून पसार होतात. वर्दळीच्या ठिकाणीही असे प्रकार घडले आहेत. काही धाडसी महिलांनी प्रतिकारही केला तरी पूर्ण तयारीनिशी आलेले चोरटे हाती लागत नाहीत. प्रतिकार करणाऱ्यांवर ते हल्लाही करतात.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यात अशा ३९ गुन्ह्यांची नोंद झाली. याचा अर्थ महिन्याला सरासरी सहा ते सात घटना घडल्या आहेत. यातील केवळ १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. यावरून चोरटे सापडण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्यासह महिलांनीही अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
मदतीचा बहाणा अन्...
‘मॉर्निंग वॉक’ अथवा इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या वृद्ध महिलांना चोरटे ‘टार्गेट’ करतात. त्यांच्यावर पाळत ठेवून दुचाकीवर येऊन दागिने हिसकावले जातात. काही वेळा मदत करण्याच्या बहाण्याने फसवून सोनसाखळी लंपास केली जाते.
महिलांच्या जिवाला धोका
सोनसाखळी हिसकावताना अनेक महिलांना दुखापती झाल्या आहेत. चिखलीत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून त्यांना ढकलून दिले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे चोरीशिवाय महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
बसमध्ये सर्रास चोऱ्या
चोरटे बसमध्ये प्रवासी महिलेच्या जवळ गर्दी करून राहून दागिन्यांची चोरी करतात. अनेकदा बसमध्ये चढताना गर्दीत हात साफ केला जातो.
अशी घ्या काळजी
- एकट्या महिलेने दागिने घालून घराबाहेर पडू नये
- संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा
- मोबाईलवर बोलताना सावध राहावे
- अंगावरील दागिन्यांचे जास्त प्रदर्शन करू नये
- निर्जनस्थळी फिरायला जाणे टाळावे
- सोबत मोबाईल ठेवावा
- बाजारपेठा, रेल्वेस्थानक, बस थांबे अशा गर्दीच्या ठिकाणी दागिने घालणे टाळावे
- निर्जन रस्त्याने एकटीने जाणे टाळावा
---
सोनसाखळी चोऱ्या
(जानेवारी ते जून २०२५)
महिना / प्रकार / उघड गुन्हे
जानेवारी / ८ / २
फेब्रुवारी / ७ / ३
मार्च / ७ / २
एप्रिल / ६ / ३
मे / ३ / १
जून / ८ / ५
एकूण / ३९ / १६
---
काही गुन्हे
३ जून ः चाकणमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार
२८ जून ः भोसरीतील पीएमपी बस थांब्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास महिलेच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या सोनसाखळीची चोरी
८ जुलै ः संभाजीनगरमध्ये सायंकाळी पाच वाजता ५९ वर्षीय पादचारी महिलेची एक लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून नेली
९ जुलै ः यमुनानगरला रात्री नऊच्या सुमारास पतीसमवेत फिरायला गेलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावली
---
पोलिसांनी काय करावे
- वर्दळीच्या ठिकाणी सतत गस्त असावी
- गुन्ह्याचा त्वरित तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी
- महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकाची माहिती द्यावी
हेल्पलाइन क्रमांक ः ११२, १०९१
---
आगामी काळातील सण-उत्सव
- श्रावणी सोमवार
- मंगळागौर
- नागपंचमी
- नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन
- गोकुळाष्टमी
- हरितालिका पूजन
- गणेश चतुर्थी
- नवरात्र
- दसरा
- दिवाळी
---
सोनसाखळी चोरीसह इतरही गुन्हे रोखण्यासाठी सकाळी व सायंकाळी परिसरात गस्त वाढवली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांवरही बारीक नजर आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
---
आई अजूनही सावरलेली नाही
सोनसाखळी चोरीमुळे महिलेला किती धक्का बसू शकतो हे एका प्रकरणात दिसून आले. एका प्रौढाने सांगितले की, ‘माझी आई नातवाला क्लासला सोडून घरी पायी येत होती. वाटेत एक जण दुचाकीवरून आला आणि थोडा पुढे जाऊन थांबला. तोच पाठीमागून आलेल्या त्याच्या साथीदाराने काही क्षणांत आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तिला ढकलून दिले. सोनसाखळी हिसकावून चोरटा पुढे उभ्या असलेल्या दुचाकीवर मागे बसून पसार झाला. आमच्या घराच्या जवळच हा प्रकार घडला. तेव्हा शेजारीच आठवडे बाजार भरला होता. त्यामुळे वर्दळ होती. त्यानंतरही भरदिवसा हा प्रकार घडला. या घटनेच्या धक्क्यातून माझी आई अद्याप सावरलेली नाही.’
-------