राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ : शहरांतील धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यातून विरंगुळा मिळावा, यासाठी आता सुटीचा प्रत्येक क्षण जपून वापरण्याचा चाकरमान्यांचा कल वाढत आहे. विशेषतः शनिवार आणि रविवार किंवा सलग सुट्ट्यांच्या काळात शहराबाहेर जाण्याचा ‘ट्रेंड’ वाढला आहे. परिणामी, निसर्गरम्य भागांतील खासगी बंगल्यांची (विला) मागणी झपाट्याने वाढली आहे. याचा थेट परिणाम म्हणून सुट्टीच्या दिवशी या बंगल्यांची भाडेवाढ दुपटीने केली जात आहे.
शहरी भागांतील नागरिकांचा कल आता दीर्घ सुट्ट्यांऐवजी दोन ते तीन दिवसांच्या ‘वीकेंड’ सुट्यांकडे झुकला आहे. शहरातील धकाधकीपासून दूर जाऊन निवांतपणे वेळ घालवण्यासाठी पर्यटक खासगी बंगले एक-दोन दिवसांसाठी भाड्याने घेत आहेत. काही वर्षांपूर्वी लॉजमधील एखादी खोली भाड्याने मिळत होती. तेथे कुटुंबीय विरंगुळ्यासाठी जात असत. पण, आता हाच ‘ट्रेंड’ बंगल्यांपर्यंत आला आहे.
पर्यटनस्थळांवर मागणी वाढली
लोणावळा, खंडाळा, मुळशी, तळेगाव, पवना धरण, भोरसारख्या ठिकाणांबरोबरच महाबळेश्वर, पाचगणी यांसारख्या थंड भागांतील खासगी बंगल्यांना मोठी मागणी असल्याचे निरीक्षण पर्यटकांनी नोंदवले आहे.
तीन-चार आठवडे आधीच बुकिंग
पर्यटनाची सुविधा पुरवणाऱ्या खासगी कंपन्या तसेच विविध ऑनलाइन पोर्टलवर ‘वीकेंड’च्या काळात या बंगल्यांच्या बुकिंगसाठी पर्यटकांना काही महिने आधीच नियोजन करावे लागत आहे. काही लोकप्रिय बंगले तर तीन ते चार आठवड्यांपूर्वीच फुल बुक होत आहेत.
शनिवार-रविवारी दुप्पट भाडे
शनिवार आणि रविवारसाठीच्या दरांमध्ये ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर दोन दिवसांसाठीचे भाडे थेट दुप्पट झाले आहे. उदाहरणार्थ, जो बंगला दिवसासाठी आठ हजार रुपये (खोल्यांच्या संख्येनुसार) भाड्याने मिळत होता, तोच आता वीकेंडला १५ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत दिला जात आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरही ‘हाऊसफुल्ल’
यंदा ऑगस्ट-सप्टेंबर या काळात अनेक सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्या आठवड्यांतही बंगल्यांच्या बुकिंगसाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
खासगी बंगल्यांच्या या वाढलेल्या मागणीचा फायदा स्थानिक पर्यटन व्यवसाय, टुरिस्ट गाइड, खाद्यपदार्थ सेवा पुरविणारे व्यावसायिक, वाहन भाड्याने देणारे यांच्यासह स्थानिक बाजारपेठांनाही होत आहे. तसेच एजंट आणि ऑनलाइन व्यावसायिकांनाही हे वाढते पर्यटन फायद्याचे ठरत आहे.
आलेख सातत्याने वर
निसर्गरम्य ठिकाणांतील खासगी बंगले आता निव्वळ ‘लक्झरी’ न राहता गरजेचे माध्यम बनले आहे. काही काळासाठी शहराच्या तणावापासून दूर जाऊन मनःशांती मिळवण्याचा मार्ग म्हणून हे ‘ट्रेंड’ उदयाला येत आहेत. त्यामुळेच या बंगल्यांची मागणी आणि दरवाढ या दोघांचा आलेख सातत्याने वर जाताना दिसतो आहे.
शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणा आणि शांतता अनुभव मिळवण्यासाठी किमान दोन दिवसांच्या सुटीचा आनंद घ्यायला आम्ही खासगी बंगला बुक केला. शनिवार आणि रविवार वगळता इतर दिवशीचे भाडे निमप्पट असते.
- विनोद चव्हाण, पर्यटक.
ठळक मुद्दे
- खासगी बंगल्याचे कमीतकमी भाडे : पाच हजार रुपये
- सुट्ट्यांच्या काळातील भाडे : १५,००० ते १६,००० रु.
- जागामालकांना उत्पन्नासह अनेकांच्या व्यवसायाला हातभार
- एजंटसह ऑनलाइन व्यावसायिकांनाही पर्यटनसेवेचा फायदा
- तीन-चार आठवडे आधीच बंगल्यांचे बुकिंग
PNE25V37158
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.