पिंपरी, ता. ११ : दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी मागील वर्षभरात ५ हजार ६४६ वाहन चालकांवर कारवाई केली असून, ५६ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहनांचे मूळ पार्ट बदलून नवीन पार्ट बसवणे नियमबाह्य आहे. तरीही काही दुचाकीचालक दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवितात. सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या दुचाकी रस्त्यावर पाहायला मिळतात. अशा दुचाकींमुळे ध्वनिप्रदूषण होते. शिवाय, रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयांसारख्या ठिकाणी या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने विविध वाहतूक विभागांतर्गत अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सायलेन्सरमध्ये बदल करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.
अपघाताचा धोका
दुचाकी चालकाने सायलेन्सरमधून अचानक मोठ्याने आवाज काढल्यास शेजारील इतर दुचाकीचालक गोंधळतात. यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघाताचा धोका वाढतो. तसेच, पादचारींबाबतही असेच घडते. अचानक मोठा आवाज कानावर पडल्यास पादचारी गोंधळतात.
सायनलेन्सरमध्ये बदल
कंपनीचे अधिकृत सायलेन्सर असताना त्यामध्ये बदल करून इतर सायलेन्सर बसविण्याची फॅशनच झाली आहे. काही दुचाकीचालक मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसवून रॅश ड्रायव्हिंग करीत सुसाट सुटतात. यांच्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
‘‘दुचाकीला नियमाप्रमाणेच सायलेन्सर असावेत. मात्र, काही वाहनचालक त्यामध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवितात. तसेच वाहनचालक सायलेन्सरमधून काढत असलेल्या आवाजामुळे अक्षरश कानठळ्या बसतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारायलाच हवा.
- करण पिचे, नागरिक
‘‘सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहन चालकांवर नियमित कारवाई केली जात आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात विशेष मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
फेब्रु. २०२४ ते फेब्रु. २०२५ कालावधीतील सायलेन्सर कारवाई
महिना कारवाई दंड
फेब्रुवारी ६०६ ६,०५०००
मार्च ४५८ ४,५६,०००
एप्रिल ३५० ३,५०,०००
मे २०५ २,०५,०००
जून ३५० ३,४९,०००
जुलै १६८ १,६८,०००
ऑगस्ट २२२ २,२२,०००
सप्टेंबर १९६ १,९६,०००
ऑक्टोबर २९८ २,९८,०००
नोव्हेंबर ४९८ ४,९८,०००
डिसेंबर ४७२ ४,७२,०००
जानेवारी ६२४ ६,२३,०००
फेब्रुवारी ११९९ ११,९८,०००
एकूण ५६४६ ५६, ४०, ०००
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.