पिंपरी,ता. १३ ः ‘‘नाटक ही जिवंत कला आहे. घरबसल्या तुम्ही एखादी फिल्म बनवू शकता. मात्र, नाटक करण्यासाठी समोर प्रेक्षक लागेल. विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल, प्रशिक्षण घ्यावे लागेल. ही शिकण्याची ही एक अखंड प्रक्रिया आहे,’’ असे मत अभिनेते संदीप पाठक यांनी व्यक्त केले.
‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित सकाळ नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संदीप पाठक यांचा ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हा एकपात्री प्रयोग ग. दि. माडगूळकर सभागृह येथे पार पडला. या अनुषंगाने ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाला भेट देऊन संदीप पाठक यांनी नाटक, चित्रपट अशा विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. यावेळी मिरॅकल ग्रुपचे संचालक अमित गावडे उपस्थित होते. मिरॅकल ग्रुप हे या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.
संदीप पाठक म्हणाले, ‘‘सध्या तंत्रज्ञान एवढं वाढलं आहे की प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. अनेक ग्रामीण भागातील तरुणांनीही तिथे राहूनच फिल्म बनवल्या आहेत. खेड्यात राहूनही स्क्रिप्ट लिहिल्या जातात. ऑडिशन्स दिल्या जातात. त्यामुळे आता ग्रामीण भागातील तरुणांना मुंबईत यायची गरज पडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनही कलाकार घडत आहेत. पण नाटक करायचे असेल तर तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत जावे लागेल. बाहेर पडावे लागेल.आधीच्या काळात बोटावर मोजण्याइतक्या नाटक शिकविणाऱ्या संस्था होत्या. आता अगदी लहान शहरांमध्येही नाटकाच्या कार्यशाळा होतात.’’
‘वऱ्हाड’मुळे नाटकाची गोडी
‘‘माझे आई वडील माजलगावला मराठीचे प्राध्यापक होते. तेव्हा लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे मी पहिलं नाटकं पाहिलं होतं. तेव्हा वडिलांना मी याची कॅसेट आणायला लावली होती. ते ऐकून मी शाळेत वऱ्हाड करायला लागलो. माझ्यासारखे किमान शंभर कलाकार असतील ज्यांना या नाटकामुळे नाटक करायची गोडी लागली. काही कलाकृती प्रेक्षकांच्या ह्रदयात आणि ओठांवर आहेत. तसंच लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ एक माइलस्टोन नाटक आहे. त्यांनी ३५ वर्षांमध्ये २८०० प्रयोग केले होते. त्यामुळे त्यांची तुलना माझ्या पहिल्या प्रयोगाशी होणार होती. याचं मला प्रचंड दडपण होतं. त्यांचा ‘ऑरा’ इतका जबरदस्त होता की, हे नाटक माझ्याकडे आल्यानंतर मी तीन महिने ते ऐकत होतो.’’ असे संदीप पाठक यांनी सांगितले.
वऱ्हाड करणार नव्हतो...
‘जेव्हा पहिल्यांदा मी या एकपात्री प्रयोगाचा सराव केला, तेव्हा ते मला सोडावं वाटलं होतं. कारण लक्ष्मणराव देशपांडे यांनी यात जेव्हा बाईचा रोल करायचे, त्यावेळी ते अत्यंत सुंदर दिसायचे. मात्र, मी तसा दिसत नाही. त्यामुळे मला हे नाटक करायला नको असे वाटत होते, अशी प्रांजळ कबुली संदीप पाठक यांनी यावेळी दिली. लक्ष्मणरावांचे या नाटकातील योगदान इतके मोठे आहे, की त्यांच्यामुळे आज मी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चे प्रयोग केले आहेत, असे पाठक यांनी सांगितले.
ही शाल जबाबदारीची
‘मी हे नाटक करायला लागल्यानंतर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘योग्य माणसाकडे योग्य शाल गेली आहे’ अशा शब्दांमध्ये कौतुक केल्याचेही पाठक यांनी आवर्जून सांगितले. या शालीचे वजन जरी हलके असले तरी सामाजिक जबाबदारी मोठी आहे. अभिनय क्षेत्रात असलेले अनेक कलाकार हे नाटक करतात. त्यामुळे नाटक हे कायमच आमच्यासारख्या कलाकारांची पहिली पसंती राहिली आहे. मराठी चित्रपटांपेक्षा मराठी नाटक हे पुढे आहे. त्यामुळे चित्रपट किंवा मालिका कशाचेही चित्रीकरण असले तरी सुटीच्या दिवस आम्ही नाटकासाठी राखून ठेवलेले असतात.’ असे संदीप पाठक म्हणाले
फोटोः 06057, 06059, 06064
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.