पिंपरी, ता. ४ ः मंजूर विकास आराखड्यानुसार चिखलीतील रस्ते व आरक्षणे ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी जमीन व जागा मालकांचे शिबिर मंगळवार (ता. ८) आणि बुधवारी (ता. ९) महापालिकेच्या चिखली गावठाणातील मुले व मुलींच्या शाळेत आयोजित केले आहे. दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशी शिबिराची वेळ आहे, अशी माहिती नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
चिखलीची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी परिसराचा विकास गतिमान करण्यासाठी मंजूर विकास योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यामध्ये रस्ते आणि आरक्षणाचा ताबा घेण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी मोठी नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र, सदर रस्ते आणि आरक्षणांनी बाधित क्षेत्र हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर अर्थात ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइटस्) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय अर्थात फ्लोअर स्पेस इंडेक्स) यांच्या माध्यमातून ताब्यात घेतल्यास महापालिकेची आर्थिक बचत होणार आहे. तसेच भूसंपादन कायद्यान्वये आरक्षित रस्ता किंवा आरक्षणाचे क्षेत्र ताब्यात आल्यास जमीन मालकांना टीडीआर किंवा एफएसआयचा पर्याय उपलब्ध नसेल. त्यामुळे रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्र आगाऊ ताब्यात घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. ८) आणि बुधवारी (ता. ९) सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत महापालिकेच्या चिखली गावठाणातील मुले व मुलींच्या शाळेत शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये जमीन वा जागा मालकांच्या प्रबोधनासाठी जागेवर नकाशा दाखवून त्यांचे क्षेत्र रस्त्याने बाधित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले जाणार आहे. रस्त्याने बाधित जागांचा आगाऊ ताबा शिबिरातच घेण्यात येणार आहे. भविष्यात जमीन मालकांनी टीडीआर किंवा एफएसआयसाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांना बाधित क्षेत्राचा टीडीआर किंवा एफएसआय एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नियमानुसार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
‘‘मंगळवार आणि बुधवार या शिबिरांच्या दिवशी जमीन मालकांनी जागेची मालकी सिद्ध करण्यासाठी सात/बारा उतारा, मोजणी नकाशा (असल्यास) सोबत आणावा. तसेच, प्रपत्र शुल्क शंभर रुपये जमा केल्यानंतर जागेवरच अ व ब प्रपत्र त्वरित देण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन मालकांनी सदर दिवशी कागदपत्रांसह उपस्थित राहून जागेचा आगाऊ ताबा देऊन महापालिकेस सहकार्य करावे.
- प्रसाद गायकवाड, नगररचना उपसंचालक, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.