अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ : मुक्त रिक्षा परवाना धोरण असतानाही २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रिक्षा परवाना घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातून २०२४-२५ मध्ये ६,१३४ जणांनी रिक्षा परवाना घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या घटल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
रिक्षाचालकांना वाहन चालविण्याचा परवाना आणि रिक्षा परमिट बंधनकारक आहे. शहरात मुक्त रिक्षा परवाना धोरण राबविण्यापूर्वी चार हजार रिक्षा परवान्यांची नोंद होती. मात्र, २०१७ मध्ये परिवहन विभागाने खुला रिक्षा परवाना धोरण सुरू केले. त्यामुळे परवाना काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. काही दिवसांनी तर शहरात परवाना घेणाऱ्यांची संख्या चौपट वाढली. पिंपरी-चिंचवड आरटीओकडे ६ एप्रिलपर्यंत ४४ हजार १४२ रिक्षांची व ३८ हजार रिक्षा परवान्यांची नोंद झाली आहे. सुरुवातीला रिक्षा परवाना काढणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत गेली. मात्र, आता विविध कारणास्तव परवाना घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे, असे निरीक्षण आरटीओ प्रशासनाने नोंदवले आहे.
‘खुले रिक्षा परवाना धोरण बंद करा’
गल्लीबोळात सेवा मिळत असल्यामुळे नागरिक रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. ऑनलाइन ॲप आधारित रिक्षा सेवा सुरू झाल्यानंतर प्रवास आणखी जलद आणि सोयीचा झाला आहे. मात्र, आता रिक्षांची संख्या वाढल्यामुळे चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे बॅंकेचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. वाहतूक कोंडीत भर पडत असून, प्रदूषणातही वाढ होत आहे. म्हणून खुले रिक्षा परवाना धोरण बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे.
असे आहेत रिक्षाचे दर
पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना २५ रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारले जातात.
परवाना घटण्याची कारणे
-रिक्षातून मिळणारे उत्पन्न घटले
-रिक्षांची चौपट वाढलेली संख्या
- सार्वजनिक वाहतुकीची वाढलेली साधने (उदा, कॅब, बाइक टॅक्सी, मेट्रो)
- रिक्षांच्या वाढलेल्या किंमती
खुला परवाना धोरण सुरू झाल्यापासून शहरात रिक्षा परवाना काढणाऱ्यांची संख्या चौपट वाढली. त्यामुळे रिक्षाचालकांचे उत्पन्न घटले आहे. रिक्षा चालकांना घर चालवणे (उदरनिर्वाह) देखील अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिक आता रिक्षा घेताना खूप विचार करतात.
- नितीन पवार, रिक्षा पंचायत
वर्ष आणि रिक्षा परवाने
२०२२-२०२३ : ४,१३८
२०२३-२४ : ६,४९७
२०२४-२५ : ६,१३४
एकूण परवाने : ३८,००७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.