पिंपरी, ता. १८ : उद्यानामध्ये धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामावरून सध्या राजकीय वादंग निर्माण झाले आहे. यावरून धार्मिक स्थळे बांधून किंवा त्यासाठी सहकार्य करून काही राजकीय कारभाऱ्यांनी मतांची पोळी भाजण्याचा आणि धार्मिकतेच्या नावे भूखंड वा मोक्याच्या जागा हडपण्याचा ‘उद्योग’ सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका प्रभाग ११ मधील उद्यानात प्रभाग १० मधील माजी महापौर मंगला कदम यांच्या माध्यमातून अनधिकृत धार्मिक बांधकाम केले जात आहे. त्याला प्रभाग ११ मधील नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी विरोध केला. त्यामुळे उद्यानातील बांधकामांच्या प्रश्नांना वाचा फुटली. यापूर्वीही अनेक उद्यानांमध्ये, त्यांच्या सीमाभिंतींलगत, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक जागेवर, महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) भूखंडांवर धार्मिक व प्रार्थना स्थळे अनेकांनी बांधली आहेत. त्यांच्यावर ‘‘....यांच्या सौजन्याने’’ असेही लिहिलेले आहे. त्यावरून अशा बांधकामांना राजकीय कारभाऱ्यांचेच अभय असल्याचे दिसते. त्याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अशा स्थळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कारवाई तुटपुंजी
महापालिकेने गेल्या आठवड्यात कुदळवाडीतील दोन अनधिकृत धार्मिक स्थळे पाडली. मात्र, ही कारवाई अपुरी आहे. उद्याने, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, महापालिका व पीएमआरडीएच्या भूखंडांवर कारवाई होताना दिसत नाही.
काही धार्मिक स्थळांची ठिकाणे
- दिघीतील रेड झोन हद्दीतील भोसरी-आळंदी रस्त्यालगत एका उद्यानाच्या जागेवर अनेक धार्मिक स्थळे उभारली आहेत.
- निगडी प्राधिकरणासह शहरातील अनेक रस्त्यांच्या पदपथावर, चौकालगत
- स्पाइन रस्त्यावर पूर्णानगर कॉर्नर कुदळवाडी सर्कल चौकात
- कुदळवाडीतील नियोजित डीपी रस्त्यांवर
- प्राधिकरणाच्या मोशी, भोसरी, चिखली, जाधववाडी परिसरातील भूखंडांवर
प्रभाग ११ मधील बांधकामाबाबत
प्रभाग ११ मधील उद्यानात सुरू असलेल्या बांधकामाला स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे, रिटा सानप, नगरसेवक नीलेश नेवाळे, कुंदन गायकवाड यांनी विरोध केला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना भेटण्यासाठी सोमवारी (ता. १८) ते महापालिकेत गेले होते. मात्र, आयुक्तांची भेट होऊ शकली नाही. ‘‘आयुक्तांशी फोनवर बोलणे झाले. ते उद्या मंगळवारी उद्यानात येऊन अनधिकृत बांधकामाची पाहणी करणार आहेत. बांधकाम सध्या बंद आहे,’’ असे नागरगोजे यांनी सांगितले.
‘अनधिकृत’वर कठोर कारवाई करा : आयुक्त
पिंपरी चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आणि अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शहराच्या नियोजनाला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच कारवाई करून मोकळ्या केलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून त्या ठिकाणी मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करावीत तसेच वृक्षलागवड करून हरित क्षेत्र निर्माण करावे, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.