यात्रेच्या नावे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
पिंपरी : चारधाम यात्रेच्या प्रवासासाठी विमान बुकिंगच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख ४०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार रावेत परिसरात घडला. या प्रकरणी रामनिवास बनारसी दास गुप्ता (रा. प्राधिकरण, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक कपूर या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना सोशल मीडियावर चारधाम यात्रेसाठी ‘हिमालयन हेली सर्व्हिसेस’ नावाची जाहिरात दिसली. त्यातील संपर्क क्रमांकावर फोन केला असता आरोपीने प्रवासाची माहिती देऊन चार लाख ४०० रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. त्यानंतर विम्यासाठी आणखी ३० हजारांची मागणी केल्याने फिर्यादींना संशय आला. फिर्यादींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फोन उचलणे बंद केले व विमानाची तिकिटे रद्द करून पैसे स्वतःकडे ठेवत आर्थिक फसवणूक केली.
जुन्या वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील गांधी पेठ येथे घडली. या प्रकरणी अतुल शाम यादव (रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित खताळ, कार्तिक कांबळे आणि साहिल (सर्व रा. थेरगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि आरोपींमध्ये जुन्या किरकोळ वादाचा राग आरोपींच्या मनात होता. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली.
मोटारीच्या धडकेत दुचाकीचालक जखमी
पिंपरी : मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.
प्रीतम ठोंबरे असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारचालक किरण सानप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम हे पिंपळे सौदागरकडे दुचाकीवरून जात असताना पिंपळे गुरव येथे समोरून येणाऱ्या मोटारीने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात प्रीतम यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले.
सील केलेल्या सदनिकेचा बेकायदा ताबा
पिंपरी : बँकेने कायदेशीर प्रक्रियेद्वारे सील केलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून प्रवेश केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवडमधील शाहूनगर येथील नीलमणी को-ऑप. सोसायटी येथे घडला.
त्यानुसार भोसरी एमआयडीसी पोलिसांनी उद्धव जे. सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीवर (दोघेही रा. शाहूनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीतील एक सदनिका बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतली. त्या सदनिकेला बँकेने सील केले होते. दरम्यान, आरोपींनी बँकेचे सील आणि दरवाजाचे लॉक तोडून आत बेकायदारित्या प्रवेश केला. तसेच बँकेने लावलेला बॅनर फाडून नुकसान केले.
गांजा बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई भुगाव येथे करण्यात आली. अक्षय संतोष साळुंखे (रा. भुकुम, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी भुगाव परिसरात थांबला असताना पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार ७५० रुपये किंमतीचा गांजा सापडला.
थेरगावात तरुणाकडून कोयता जप्त
पिंपरी : बेकायदारित्या कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई थेरगाव स्मशानभूमीजवळ करण्यात आली. आयुष आनंद वाकोडे (रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.