पिंपरी, ता. १९ : शहरात सध्या महावितरणकडून ‘स्मार्ट मीटर’बाबत अघोषित सक्ती सुरू असल्याचा आरोप होत आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्र भोसरीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक मीटर बसवले आहेत. तर, नागरिकांच्या तक्रारींमुळे पिंपरी विभागांतर्गत मीटर बसवले जात नसल्याचे समोर आले आहे.
वीजबिलाच्या आकड्यात वाढ होत असल्याच्या तक्रारींनंतरही महावितरणकडून स्मार्ट मीटर बदलण्यात येत आहे. नव्या अर्जांची मंजुरी, जुने, खराब व तक्रारीनुसार बदललेल्या मीटरच्या जागी नव्याने ‘स्मार्ट मीटर’ बसवले जात आहेत. विशेष म्हणजे मोठ्या सोसायट्या, दाट लोकवस्ती अशा भागांत ठेकेदारांच्या मदतीने हे मीटर बदलण्याचा सपाटाच सुरू आहे, अशी तक्रार वीजग्राहक करत आहेत. अनेकदा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे मीटर बसविल्याचाही आरोप केला जात आहे.
तक्रार नाहीच; महावितरणचा दावा
‘‘जुने मीटर बदलताना ग्राहकांनी नकार दिल्यास अथवा विरोध दर्शवल्यास महावितरण अधिकारी तेथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. तेथे प्रत्यक्ष मीटरचा ‘डेमो’द्वारे रीडिंग दाखवतात. स्मार्ट मीटर कसा सुलभ आहे, हे सांगतात. सध्या या मीटरबाबत कोणतीही तक्रार नाही,’’ असा दावा महावितरण अधिकाऱ्यांनी केला आहे.
कोथरूड, पिंपरी सर्वांत मागे
पुण्यातील कोथरूड व पिंपरीतील सर्वांत जास्त लोकवस्ती असलेले परिसर आहेत. या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे स्मार्ट मीटर बदलण्याचा वेग कमी आहे. तक्रारी, सोसायट्यांचा नकार व मीटर बदलू दिले जात नसल्याने अनेक भागांत मीटर बसविले नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोथरूडमध्ये केवळ २३ टक्के तर, पिंपरीत ३३ टक्के मीटर बसवण्यात आले आहेत, असे महावितरणने सांगितले.
अशी आहे आकडेवारी
विभाग/ ग्राहक संख्या / मीटर बसवले/ प्रलंबित / टक्केवारी
पिंपरी/ ५,१०,९०४/१,७१,६०९/३,३९,२९५/३३.५९
भोसरी/४,२९,७२२/२,१८,८०९/२,१०,९१३/५०.९२
स्मार्ट मीटरबाबत कोणताही गैरसमज न ठेवता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्याची कार्यपद्धती आणि फायदे समजून घ्यावे. स्मार्ट मीटरबाबत कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही.
- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल
विजेच्या समस्या दूर करणे आवश्यक असताना, स्मार्ट मीटरवर भर दिला जात आहे. प्रत्यक्षात सुविधा स्मार्ट करावी. मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेतले जात नाही. मोफत मीटर असल्याचे सांगून ‘स्मार्ट मीटर’ माथी मारतात.
- दिगंबर काकडे, वीज ग्राहक, पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.