पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ : राज्यातील महापालिका निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणचे ६९ नगरसदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांत पिंपरी चिंचवडमधील दोघांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, निवडणूक प्रक्रियेत ‘मतदार राजा’ असेल तर त्यांनीच बिनविरोध ठरवायला हवे. त्यासाठी मतपत्रिका असो, की ईव्हीएम यामध्ये संबंधित उमेदवार व ‘नोटा’चा (यापैकी नाही) पर्याय असायला हवा. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदार कोणाला कौल देतात, हे ठरवता येईल आणि खऱ्या अर्थाने निर्भिडपणे मतदान प्रक्रिया पार पडली, असे म्हणता येईल.
राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक प्रक्रिया १६ जानेवारी रोजी पूर्ण झाली. त्यामध्ये विविध संवर्गातील ६९ जागांवरील इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. केवळ एकेकच उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध कसे निवडून येऊ शकतात? असा आक्षेप घेण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील दोन जागांबाबतचे अहवालही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवले होते. त्यानुसार आयोगाने संबंधितांना मतमोजणीच्या दिवशी अर्थात १६ जानेवारी रोजी बिनविरोध घोषित करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे.
मतदार राजा आहे म्हणून...
लोकशाही शासन पद्धतीत मतदारांना सर्वाधिक महत्त्व आहे. निवडणूक लढविणाऱ्यांपैकी सर्वाधिक मते मिळालेला अर्थात सर्वाधिक मतदारांनी पसंत केलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. मात्र, बिनविरोध निवड झालेल्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जात नाही. संबंधित जागेवरील मतदान सोडून अन्य जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाते. त्यात ‘नोटा’चा पर्यायही असतो. त्यामुळे संबंधित उमेदवारांना किती मतदारांनी नाकारले हे स्पष्ट होते. असे असेल तर बिनविरोध ठरणाऱ्या उमेदवारांच्या नावांसह ईव्हीएममध्ये ‘नोटा’ पर्याय ठेवून मतदान घ्यायला हवे. म्हणजे संबंधित उमेदवाराला किती मतदारांनी पसंती दिली आणि कितींनी नाकारले हेही स्पष्ट होईल.
अन्य जागांवर ‘नोटा’चा पर्याय
मुंबई वगळता २८ महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने ‘अ’, ‘ब’,‘क’ आणि ‘ड’ जागांसाठी झाली. त्यामुळे बिनविरोध ठरलेल्या प्रभागांतील जागा अर्थात उमेदवाराचे नाव वगळून उर्वरित जागांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हे ईव्हीएमवर नमूद होती. शिवाय, ‘नोटा’ हा पर्यायही होता. निवडणूक निकालानंतर बहुतांश उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशांची संख्या पिंपरी चिंचवडमध्ये ६९१ पैकी २३३ होती. म्हणजेच २३३ उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट होते.
बिनविरोधचा अहवाल
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी प्रभाग ‘६-ब’ आणि प्रभाग ‘१०-ब’ अशा दोन जागांवर माघारीच्या दिवशी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला होता. यामध्ये अनुक्रमे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांचा समावेश होता. त्यामुळे दोघांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागितला होता. त्यानुसार अहवाल पाठवला होता. त्याची शहानिशा करून आयोगाने १५ जानेवारी रोजी आयुक्तांना पत्र पाठवून बिनविरोध जागांचा निकाल जाहीर करण्याबाबतचा आदेश दिला. त्यानुसार मतमोजणी अर्थात निकालाच्या दिवशी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली आहे.
निवडणूक आयोगाचे पत्र
राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘‘पिंपरी चिंचवड महापालिका जागा ६-ब व १०-ब वरील उमेदवारांना बिनविरोध निवडून येताना इतर उमेदवारांवर दबाव आणणे, आमीष दाखवणे, अन्य लेखी तक्रार व निवडणूक संदर्भातील न्यायालयीन प्रकरण यापैकी कोणतीही बाब निदर्शनास आली नसल्याचा अहवाल आपण सादर केला आहे. त्यास अनुसरून लांडगे रवी लक्ष्मण (भाजप : जागा क्रमांक ६-ब) आणि चांदगुडे सुप्रिया महेश (भाजप : जागा क्रमांक १०-ब) या उमेदवारांना निवडून आल्याचे जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता आहे.’’
बिनविरोध जागांसाठीची स्थिती
प्रभाग ६-ब : रवी लांडगे यांच्यासह अपक्ष श्रद्धा लांडगे आणि प्रसाद ताठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोघांनीही माघार घेतली होती.
प्रभाग १०-ब : सुप्रिया चांदगुडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या वर्षा भालेराव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गीता चव्हाण, अपक्ष रेणुका भोजने व रोहिणी रासकर यांचा समावेश होता. चौघींनीही माघार घेतली होती.
बिनविरोध प्रभागात ‘नोटा’चा प्रभाव
- प्रभाग ६ : ‘अ’ जागेसाठी ४, ‘क’ आणि ‘ड’ जागेसाठी प्रत्येकी २ उमेदवार होते. ‘अ’ जागेसाठी नोटाची ४७५ मते आहेत. एका उमेदवाराला नोटापेक्षा कमी ४६१ मते मिळाली आहेत. ‘क’ ‘व’ ड जागेसाठी प्रत्येकी ६१२ मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला आहे.
- प्रभाग १० : ‘अ’ जागेसाठी ८, ‘क’ आणि ‘ड’ जागेसाठी प्रत्येकी ९ उमेदवार होते. ‘अ’ जागेसाठी नोटाची ८५० मते पडली आहेत. तीन उमेदवारांना यापेक्षा कमी मते आहेत. ‘क’ जागेसाठी ९३५ मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला आहे. त्यापेक्षा कमी मते चार उमेदवारांना आहेत. ‘ड’ जागेसाठी ९७२ मतदारांनी नोटा पर्याय वापरला आहे. त्यापेक्षा कमी मते पाच जणांना मिळाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.