पिंपरी, ता. ३१ : शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर टोइंग कारवाई करत दंड वसूल केला जात आहे. अशाप्रकारे मागील वर्षभरात एक लाख सहा हजार १६७ दुचाकी व २४ हजार ९१६ चारचाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसथांबे, शाळा-महाविद्यालये, रुग्णालय परिसर तसेच अरुंद रस्त्यांवर ‘नो पार्किंग’मुळे होणाऱ्या अडथळ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. काही वाहनचालक अवघ्या काही मिनिटांसाठी वाहन उभे करून निघून जात असल्याचे सांगतात; मात्र त्या काही मिनिटांतच वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते.
वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनांद्वारे दुचाकी व चारचाकी वाहने उचलून वाहतूक विभागात जमा केली जात आहेत. वाहन परत मिळवण्यासाठी चालकांना दंडासह टोइंग शुल्क भरावे लागत आहे. यामुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसत आहे.
वाहतूक कोंडी
‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी राहिल्यामुळे एकाचवेळी दोन वाहनांना जाण्यास जागा राहत नाही, परिणामी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यातून रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या वाहनांना वेळेवर मार्ग मिळत नाही.
वाहतूक पोलिसांचे आवाहन
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहन लावताना पार्किंग फलक, रस्त्यावरील चिन्हे आणि सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत पार्किंगचा वापर करावा, रस्त्याच्या कडेला किंवा ‘नो पार्किंग’ फलक असलेल्या ठिकाणी वाहन लावू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई अटळ असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘‘नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर टोइंग कारवाई केली जात असते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
सन २०२५ मध्ये केलेली कारवाई
महिना दुचाकी कारवाई चारचाकी कारवाई
जानेवारी ६१६८ १२९३
फेब्रुवारी ७२३७ १५२४
मार्च ९२२२ १८३३
एप्रिल ९३६३ २१३५
मे ९०८१ २२९५
जून ८८६७ २१९०
जुलै ९४४८ २३११
ऑगस्ट ९२४९ २३०३
सप्टेंबर ९२९१ २१९०
ऑक्टोबर ९०८५ २२४७
नोव्हेंबर ९१२१ २२३८
डिसेंबर १००३५ २३५७
एकूण १०६१६७ २४९१६
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.