पिंपरी, ता. १५ ः खासगी शाळांमधील आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळविण्याच्या आशेने आलेल्या पालकांना महापालिका शिक्षण विभागातील समन्वयाच्या अभावाचा फटका बसला. टोकन मिळालेल्यांप्रमाणेच न मिळालेले असे सुमारे बाराशे पालक पडताळणी केंद्रावर पहाटेपासूनच येऊ लागले. तेथे महापालिकेचे कर्मचारी अवतीर्ण होईपर्यंत दुपार झाली. यामुळे अनेकांना भर उन्हात आणखी घाम फुटला.
या प्रवेशासाठी पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी आवश्यक असते. त्यासाठी सोमवारी (ता. १३) २७० पालकांना टोकन देण्यात आली. मंगळवारी सरकारी सुट्टी होती. त्यामुळे बुधवारी सकाळी सात वाजताच पालक कागदपत्र पडताळणी आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील शाळेत जमू लागले. टोकन घेण्यासाठी सुमारे ७५० पालकांची गर्दी झाली होती. दुपारी एक वाजला तरीही पालिकेचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. पालकांची गर्दी पाहुन शाळेतील सुरक्षा रक्षकाने ‘दुपारी तीन नंतर या,’ असे सांगितल्याने पालकांनी तीव्र संताप केला.
दरम्यान, पडताळणी समितीच अद्याप गठित नसल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारी असो, की कर्मचारी यांच्यापैकी कुणीही केंद्रावर उपलब्ध नसताना का बोलविण्यात येत आहे, असा सवाल पालकांनी केला. महापालिकेच्या शिक्षण विभागातील नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो पालकांना बसला. काही पालकांना वाढत्या उन्हामुळे चक्कर आली. पालकांसोबत आलेल्या लहान मुलांचे तर फार हाल झाले. सकाळी सात वाजता आलेले पालक सुमारे साडेचार वाजता पालक परतले.
ऑनलाइन लॉटरी काढल्यानंतर प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची केंद्र स्तरावर पडताळणी होते. प्राथमिक प्रक्रियेनंतर प्रवेश निश्चित होतो. अद्याप समितीच स्थापन न झाल्याने पडताळणी केंद्रांची संख्या ठरलेली नाही. त्यामुळे पिंपरी विभागातील पालक आकुर्डीच्या केंद्रात, तर मुळशी भागातील पालक पिंपरी केंद्रावर जमले होते. नेमके कोणत्या केंद्रावर जायचे, याची माहिती नसल्याने पालकांची भर उन्हात फरफट झाली.
दोन अधिकारी असूनही गोंधळ
महापालिकेच्या शिक्षण विभागात उपायुक्त ममता शिंदे विभागप्रमुख, तर शिक्षणाधिकारी संगीता घोडेकर यांची अधिकृत नेमणूक आहे. अर्ज तपासणीसाठी आवश्यक पडताळणी समिती अद्याप स्थापन झाली नसताना, पालकांकडून केवळ कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. पडताळणी जागेवरच पूर्ण न करता दोन-तीन दिवसांनी या, पावती घेऊन जा, असे पालकांना सांगितले जात आहे. प्रवेशाच्या मुदतीत अशा वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने अनेक पालकांनी संताप व्यक्त केला.
पडताळणीची जबाबदारी कोणाची ?
सध्या आरटीई आणि पटपडताळणीची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे एकूणच पडताळणीचे नियोजन बिघडले आहे. यामुळे आरटीई प्रक्रियेतील जबाबदारी नेमकी कोणाची, यावरच संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा फटका थेट पालकांना बसत आहे.
---
पालक म्हणतात
माझ्या मुलाला प्रवेश सोडतीत नंबर आला आहे, मी सोमवारपासून पडताळणीसाठी टोकण घेण्यासाठी फेऱ्या मारत आहे. आज सकाळी बोलवले आहे, पण अधिकारी उपलब्ध नसल्याने दुपारी तीन नंतर या असे सुरक्षारक्षक सांगत आहे.
- कल्याणी गवारे, मोशी
मला पडताळणीसाठी टोकन दिले आहे. पालकांना वारंवार पायपीट करावी लागत आहे. कामावर खाडा करून सकाळपासून पालक येऊन बसले आहेत, त्यांना वेठीस धरण्यात येत आहे.
- विजय देसाई, किवळे
माझ्या ॲलॉटमेंट लेटरवर मुळशी केंद्र सांगितले, तिकडून मला पिंपरी केंद्रात जायला सांगितले. तिकडे गेलो, तर आकुर्डी पडताळणी केंद्रात जाण्यास सांगितले. अशा प्रकारांमुळे पालक त्रस्त झाले आहेत.
- रूपेश कांबळे, ताथवडे
---
सध्या पॅट परीक्षा आणि पटपडताळणी सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा गोंधळ उडाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पालक विनाकारण अस्वस्थ होत आहेत. आज ७५६ अर्जाची तपासणी केली.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
-----
गोंधळात गोंधळ
- टोकन दिलेले पालक ः २७०
- टोकन न घेतलेले पालक ः ९३०
- अर्ज जमा केले ः ७५६
- एकूण कर्मचारी ः १३
- पडताळणी काऊंटर ः ६
- टेबल ः १३
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.