पिंपळे गुरव, ता. २८ ः आगामी जनगणना २०२६-२७ मोहिमेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून पहिल्या टप्प्यात प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. १ ते १५ मेपर्यंत नागरिकांसाठी ऑनलाइन स्व-गणना कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
जुनी सांगवी येथील महानगरपालिकेची (क्रमांक ४९) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तेथे कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या तांत्रिक बाबी, ॲप हाताळणी आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. उपायुक्त अण्णा बोदडे आणि क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवली जात आहे.
या मोहिमेसाठी ३८५ प्रगणक आणि ६४ पर्यवेक्षक अशी एकूण ४४९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४ एप्रिलपासून सुरू झालेले हे प्रशिक्षण ८ मे पर्यंत चालणार असून नऊ बॅचेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दररोज सुमारे ५० प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले जात आहे.
जनगणना कार्यालयाकडून नियुक्त अनुभवी कर्मचारी निर्मला कैलास, सुवर्णा घुगे, सावता गिड्डे, शहनाज कुलकर्णी आणि सुनीता तामने हे प्रगणकांना प्रत्यक्ष कामासाठी तयार करत आहेत.
यावेळच्या जनगणनेत स्व-गणना ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. १ ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांना एचएलओ ॲपद्वारे स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाइन नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्षेत्रीय पातळीवर लवकरच प्रत्यक्ष जनगणना कामाला सुरुवात होणार आहे.
मोहिमेचा आराखडा
- १ ते १५ मे नागरिकांसाठी ऑनलाइन स्व-गणना कालावधी
- १६ मे ते २४ जूनपर्यंत प्रगणकांकडून घरोघरी ‘हाऊस लिस्टिंग’, ब्लॉक मॅपिंग
- दुसरा टप्पा : प्रश्नावलीनुसार सविस्तर माहिती संकलन
- प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढील दोन वर्षे सुरू राहणार
जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे कार्य आहे. ‘ह’ प्रभागातील नागरिकांनी १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच १६ मेनंतर प्रगणक घरी आल्यानंतर अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सहभागी व्हावे.
- पूजा दुधनाळे, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.