पिंपरी, ता. ४ : शहरातील विविध भागांतील रस्ते दुरुस्ती, नाले आणि पावसाळी जलवाहिन्यांच्या कामांच्या निविदांना महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. रुग्णालयांसाठी उपकरणे व वैद्यकीय पुस्तके खरेदी करणे, तसेच खेळाडूंना आर्थिक साहाय्य देण्याच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.
सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. खराळवाडी, कामगारनगर, यशवंतनगर, उद्यमनगर, चिखली आणि भोसरी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामांचा मंजूर प्रस्तावांत समावेश आहे. चऱ्होली, वडमुखवाडी आणि चोविसावाडीतील महापालिका इमारती, स्वच्छतागृहे, पावसाळी जलवाहिन्या व चेंबर दुरुस्तीच्या निविदांनाही मान्यता मिळाली. एम्पायर इस्टेट नाल्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
महापालिका रुग्णालयांसाठी वॉशिंग मशिन तसेच नवीन भोसरी व जिजामाता रुग्णालयांतील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ७८ प्रकारची पुस्तके खरेदी करण्यास मंजुरी दिली. जिजामाता रुग्णालयातील सी-आर्म व एक्स-रे यंत्रणेचे निकामी सॉफ्टवेअर बदलण्यासही मान्यता देण्यात आली. प्रांशु सूर्यवंशी, साजिद तांबोळी, अन्वर अन्सारी, प्रणीत आढाव आणि स्नेहा कमलदिन्नी यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडा धोरणानुसार आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले. प्रगती गायकवाड यांना प्रमाणपत्र पडताळणीनंतर साहाय्य देण्यास मान्यता दिली.
गृहप्रकल्पांची दुरुस्ती
चिखलीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहप्रकल्पाची उर्वरीत सीमाभिंत आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील इमारतींच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली. सावित्रीबाई फुले अकादमीच्या संचालकांना मुदतवाढ देण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच १०० गणेश विसर्जन स्थळांवरील निर्माल्य संकलनासाठी कलश खरेदी व वितरणाच्या आदेशाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.