पिंपरी, ता. १ ः ‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे मातीतून उभे राहिलेले नेतृत्व होते. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पिंपरी चिंचवडमध्ये भक्कम आणि विश्वासार्ह नेतृत्व उभे केले. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवणे हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या विकासाचे संपूर्ण श्रेय जगताप यांना देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक आमदारांसह विरोधकांच्या दाव्यांना छेद दिला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पिंपळे गुरव येथे उभारण्यात आलेल्या शक्तिस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, आप्पासाहेब रेणुसे, चंद्रकांत मोकाटे आदी यावेळी उपस्थित होते.
‘गावखेड्यांपासून ते आधुनिक मेट्रो सिटीपर्यंत सर्वांगीण विकासातून लक्ष्मण जगताप यांची दूरदृष्टी ठळक दिसते. शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरणे अशक्य आहे,’ असे नमूद करत, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवड हे मिनी महाराष्ट्र आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे काम लक्ष्मण जगताप यांनी केले. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर ते आमदार असा त्यांचा प्रवास शहराच्या विकासाशी घट्ट जोडलेला होता.’’
‘महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, इंद्रायणी नदी सुधारणा, कचऱ्यापासून वीज निर्मिती, अमृत योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा अशी गेल्या दहा वर्षांत पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा बदलून टाकणारी किमान पन्नासहून अधिक महत्त्वाची विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. याचा सामान्य नागरिकांना फायदा झाला असून, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, पर्यावरण आणि नागरी सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. ही सर्व कामे होण्यामागे लक्ष्मण जगताप यांची दूरदृष्टी होती,’ असेही त्यांनी नमूद केले.
विकासकामेच कार्याची साक्ष
विकासकामांमुळेच पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही सर्व कामे पूर्णत्वास गेल्यानंतर या शहरात आणखी मोठे आणि सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान होईल. लक्ष्मण जगताप यांनी कचऱ्यापासून विद्युत निर्मितीला चालना दिली. अमृत योजनेंतर्गत नागरिकांच्या घरापर्यंत चोवीस तास पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचावे, ही दूरदृष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. ही सर्व विकासकामे जगताप यांच्या स्मरणात राहणाऱ्या कार्याची साक्ष देतात, असेही ते म्हणाले.
---
ते मुख्यमंत्री म्हणाले अन् शपथविधी!
आठवणीला उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, लक्ष्मण जगताप यांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी होती. विधान परिषदेच्या निवडणुकीचा तो क्षण मी विसरू शकत नाही. अटीतटीची परिस्थिती होती. आमदार म्हणून त्यांचे मत महत्त्वाचे होते. त्यांचे बंधू शंकर जगताप यांना मी फोन केला. ‘पक्षाला गरज आहे, मात्र लक्ष्मण भाऊंची शारीरिक परिस्थिती असेल तरच त्यांना मतदानाला आणा,’ असा निरोप मी दिला. भाऊंच्या कानावर ही गोष्ट पोहोचली. तेव्हा त्यांनी, ‘पक्ष प्रथम’ असे म्हणत ‘मी मतदानाला जाणारच’ असे सांगितले. कार्डिॲक ॲम्ब्युलन्समधून येऊन त्यांनी मतदान केले. मला त्यांनी ‘मुख्यमंत्री साहेब’ म्हणून हाक मारली. त्यानंतर १५ ते २० दिवसांतच सत्ता बदल झाला. मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी झाला.
---
‘सकाळ’च्या ‘लक्ष्मणपर्व’चे कौतुक
‘सकाळ’च्या ‘लक्ष्मणपर्व’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अनुभवलेले लक्ष्मण जगताप यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि कार्य या पुस्तकातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे
लक्ष्मण जगताप हे केवळ निवडणुका जिंकणारे नेते नव्हते, तर लोकांची मने जिंकणारे नेतृत्व होते, असे स्पष्ट होते. आमच्या आठवणींमध्ये ते सदैव जिवंत राहतील, असे भावनिक उद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. हे शक्तीस्थळ आणि लक्ष्मणपर्व हे दोन्ही शहरासाठी काम करताना आम्हा सर्वांना ऊर्जा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ‘लक्ष्मणपर्व’ कॉफीटेबल बुकचे विशेष कौतुक केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.