पिंपरी, ता. ११ ः मोशी प्राधिकरणातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्थापत्य व विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. त्याच्या निविदा प्रक्रियेवरून स्थायी समिती सभेत बुधवारी (ता. ११) सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आमने-सामने आले. निविदा प्रक्रिया ठेकेदारधार्जिणी असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतल्याने संबंधित दोन्ही विषय तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे स्थायी समिती सभेतही १६ पैकी भाजपचे ११, राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेना एक असे संख्याबळ आहे. भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर स्थायी समितीची चौथी सभा बुधवारी (ता. ११) झाली. त्यात विविध २५ विषय कार्यपत्रिकेत होते. १६ आणि १८ क्रमांकांच्या विषयांना शिवसेनेने आक्षेप घेतला. हे विषय मोशी प्राधिकरणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युत विषयक (सुशोभीकरण) आणि रोषणाई करण्यासाठी आयुक्तांनी मान्यता दिलेल्या निविदा प्रक्रियांसंदर्भातील होते.
असे होते विषय
- छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युत विषयक कामे (सुशोभीकरण) करण्यासाठी स्थापत्य विभागाकडील ३२ कोटी ३४ रुपये अपेक्षित खर्चाची निविदा जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार दोन निविदा प्राप्त होत्या. एक अधिक दराची होती. दुसरी धनेश्वर कंस्ट्रक्शन कंपनीची निविदा ३२ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपयांची होती. रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग चार्जेस मिळून ३२ कोटी ४३ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत काम करून घेण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती.
- छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरामध्ये विद्युत रोषणाई व त्या अनुषंगिक कामे करण्याची निविदा विद्युत विभागाने प्रसिद्ध केली होती. त्यासाठी प्राप्त निविदांपैकी मुव्हिंग पिक्सेल्स ठेकेदाराची निविदा रकमेच्या १८ कोटी ६६ लाख पेक्षा सात टक्के कमी दराने प्राप्त होती. आयुक्तांनी निविदा मंजूर दराने १७ कोटी ३५ लाख ४७ हजार रुपयांपर्यंत कामे करून घेण्यास मान्यता दिली होती.
शिवसेनेची भूमिका
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यासंबंधित कामांसाठीच्या निविदा ठेकेदारधार्जिण्या आहेत. कारण, अशाच प्रकारच्या अन्य कामांसाठीच्या निविदा सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी दराच्या आहेत. स्थापत्य व विद्युत विषयक कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली असती तर स्पर्धा होऊन अधिक प्रस्ताव आले असते. कमी दराची निविदा स्वीकारली असती. यात महापालिकेचा फायदा आहे. त्यासाठी दोन्ही विषय तहकूब ठेवण्यास सुचवले होते, असे स्थायी समितीतील शिवसेना सदस्या सुलभा उबाळे यांनी सांगितले.
जागेवर जाऊन पहाणी करणार
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी ताब्यात असलेल्या उर्वरित जागेत करायच्या स्थापत्य व विद्युत विषयक कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी संबंधित विषय तहकूब केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
खासगी संस्थेतर्फे संचालन
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची उभारणी महापालिकेतर्फे केली जात आहे. त्या परिसराचे सुशोभिकरणही महापालिकाच करत आहे. मात्र, त्यासाठी खासगी संस्थेची स्थापना केली असून त्याअंतर्गत सर्व काम केले जात असल्याचे भासवले जात आहे. या प्रकरणाचीही माहिती घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे सुलभा उबाळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.