पिंपरी : मालमत्तेच्या मालकीवरून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात हातोडा मारून प्राणघातक हल्ला केला. ही घटना जुनी सांगवीतील ढोरे नगर येथे घडली. या प्रकरणी हरिश श्याम ढोरे (रा. पंचदीप अपार्टमेंट, जुनी पोस्ट ऑफिस लाइन, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नारायण आत्माराम ढोरे, अभिजित नारायण ढोरे आणि एक महिला यांना अटक केली आहे. फिर्यादी व त्यांचे वडील ढोरे नगर मधील कामधेनू इमारतीतील फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता, आरोपींनी तिथे येऊन जागेच्या मालकीवरून फिर्यादी व त्यांच्या वडिलांशी भांडण काढले. त्यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नारायण आणि अभिजित यांनी यांच्या वडिलांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने हातोडा मारला. तसेच फिर्यादी यांनाही हातोड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
गुंतवणुकीवर पैसे कमविण्याच्या आमिषाने २७ लाखांना गंडा
पिंपरी : गुंतवणुकीवर पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २७ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन ऑनलाइन गुंतवणुकीच्या बहाण्याने दिशाभूल केली. वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून एकूण २७ लाख ७२ हजार ४७ रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतले. मात्र, त्यानंतर पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.
हळद खरेदीच्या करारात व्यावसायिकाची फसवणूक
पिंपरी : हळद खरेदीचा करार करून माल घेतला. मात्र, नंतर पैसे न देता एका व्यावसायिकाची साडेअकरा लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखलीतील राजे शिवाजी नगर येथे घडली. याप्रकरणी चेतन मधुकर भोसले (रा. सत्यम रेसीडेन्सी, राजे शिवाजीनगर, चिखली, मूळ- चिंधवली, सातारा) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनोद शांताराम सायगावकर (रा. रायगड, नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने त्याच्या कंपनीसाठी फिर्यादीकडून हळद खरेदी करण्याचा करार केला होता. या करारानुसार त्याने १८ लाख ३५ हजार २७८ रुपयांचा माल घेतला. मात्र, त्या बदल्यात केवळ सहा लाख ७० हजार रुपये दिले. उर्वरित ११ लाख ६५ हजार २७८ रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केली.
गांजा विक्रीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चऱ्होली येथील आझादनगर येथे करण्यात आली. राजेंद्र विष्णू आदुडे (रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली, मूळ- छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, मलकेकर (भाटनगर, पिंपरी) या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. आरोपी राजेंद्र हा रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून पोलिसांनी गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा गांजा त्याने पिंपरीतील मलकेकर नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.