पिंपरी, ता. १४ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या दोन हजार ६७ मतदान केंद्रांवर तब्बल चार हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यासाठी वेबकास्टिंग सुविधा उभारली आहे. सर्व केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वॉर रूम उभारली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, शांतता व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी तथा सहशहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्या आधिपत्याखाली वेबकास्टिंग सुविधा उभारली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एक आणि केंद्राबाहेर एक, तसेच मतदान केंद्र असणाऱ्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांवर भालसाखळे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता महेश कावळे, बाळू लांडे, संतोष दुर्गे यांच्यासह दोन उपअभियंते व आठ कनिष्ठ अभियंते कार्यरत असतील.
नावीन्यपूर्ण आठ मतदान केंद्र
लोकशाहीचा उत्सव केवळ मतदानापुरता मर्यादित न राहता सामाजिक, पर्यावरणीय आणि नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरावा, या हेतूने महापालिकेने निसर्ग संवर्धन, स्वच्छता, आरोग्य आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारी आठ क्षेत्रीय कार्यालय कक्षेत प्रत्येक एक याप्रमाणे आठ नावीन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारली आहेत. त्यांद्वारे पर्यावरणपूरक विचार, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर समन्वय साधला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली. नावीन्यपूर्ण मतदान केंद्रांमध्ये ‘सौरऊर्जा’, ‘हरित मतदान केंद्र’, ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण’, ‘तंदुरुस्त रहा’, ‘आरआरआर’, ‘पाणी वाचवा’, ‘स्वच्छ हवा कृती आराखडा’, ‘पंचतत्त्व’ अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. या केंद्रात संबंधित विषयानुसार सजावट, माहितीपर फलक व जनजागृती संदेशांच्या माध्यमातून मतदारांमध्ये पर्यावरणीय व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे.
असे आहेत नावीन्यपूर्ण केंद्र
- सौरऊर्जा ः न्यू पुणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी
- हरित मतदान केंद्र ः आचार्य श्री आनंद ऋषीजी इंग्लिश मीडिअम स्कूल, चिंचवड
- स्वच्छतेचे महत्त्व (ओला व सुका कचरा वर्गीकरण) ः सावित्रीबाई फुले शाळा, मोशी
- आरआरआर (शाश्वत विकासाचा संदेश) ः प्राथमिक विद्यालय जाधववाडी, चिखली
- तंदुरुस्त रहा (आरोग्यदायी जीवनाचा संदेश) ः जी. के. गुरुकुल स्कूल, पिंपळे सौदागर
- पाणी वाचवा (जलसंवर्धनाचे महत्त्व) ः जी. के. गुरुकुल स्कूल, पिंपळे सौदागर
- स्वच्छ हवा कृती आराखडा (ग्रॅप), स्त्रीशक्ती सबलीकरण ः प्रिन्स सोसायटी, थेरगाव
- पंचतत्त्व (पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश) ः मनपा विद्यालय, कासारवाडी
दिव्यांग व मतदारांसाठी सुविधा
मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. ४५३ व्हीलचेअर्सची व्यवस्था केली आहे. ज्या मतदान केंद्रांवर दहापेक्षा अधिक खोल्या आहेत, त्याठिकाणी किमान दोन व्हीलचेअर्स उपलब्ध असतील. यासाठी आरोग्य विभागाकडील कर्मचारी, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय, डी. वाय. पाटील कॉलेज, महात्मा फुले कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज, भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज, लाइट हाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, बालविकास प्रकल्प कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका तसेच सक्षमा प्रकल्पाअंतर्गत कार्यरत महिलांची नेमणूक केली आहे.
आचारसंहिताभंगाचे १७ गुन्हे
आचारसंहिता व्यवस्थापन कक्षासह ३७ एफएसटी, ३२ एसएसटी व ४४ व्हीएसटी पथकांमार्फत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख ठेवण्यात येत आहे. या पथकांमार्फत आत्तापर्यंत सहा दखलपात्र व ११ अदखलपात्र असे १७ गुन्हे दाखल आहेत. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागामार्फत १८ लाख दोन हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ६२ लाख ७९ हजार १७८ रुपये किमतीचे मद्यपदार्थ, ४९ लाख ११ हजार ५३१ रुपये किमतीचा गांजा, ९ लाख ३३ हजार ३०० रुपये किमतीचे एमडी, ७ लाख ८९ हजार ७०० रुपये किमतीचे ओजी कुश असे अमली पदार्थ, १ लाख २९ हजार ५६१ रुपये किमतीच्या १९ वॉशिंग मशीन्स यांसह ६ पिस्टल, ४ गावठी कट्टे, १५ काडतुसे, २३ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. एकूण ७१ आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.