वाचक लिहितात
ओलासाठी अन्याय्य भाडेवाढ का ?
आम्ही निगडीहून शिवाजीनगरपर्यंत १३ जानेवारी रोजी ओला मिनी टॅक्सीने गेलो. हे अंतर सुमारे २० किलोमीटर आहे. तेव्हा ॲप वर दाखवल्याप्रमाणे २७४ भाडे दिले आणि चालकानेही ते घेतले. त्याच दिवशी एका तासाने शिवाजीनगरवरून निगडीपर्यंत दुसरी ओला मिनी टॅक्सी बुक केली. तेव्हा गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हरने २५ रुपये प्रति किलोमीटर भाडे पडेल असे सांगितले. तेवढ्याच अंतरासाठी आम्हाला ४७५ रुपये मोजावे लागले. एवढे भाडे का, असे विचारल्यावर चालकाने भाडेवाढ सरकारमान्य असल्याचे सांगितले. सहा सीटर टॅक्सीसाठी हाच दर ३४ रुपये प्रति किलोमीटर असल्याचेही त्याने सांगितले. हे खरे असेल तर महाराष्ट्र सरकार किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला पाहिजे. ही भाडेवाढ कोणत्या हिशोबाने करण्यात आली? ओला टॅक्सीसाठी महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहरात अशी भरमसाट भाडेवाढ लागू नसताना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ही अन्याय्य भाडेवाढ का ? प्रवाशांची ही लूटमार कशासाठी?
- शिवराम वैद्य, निगडी
-----