चिखली, ता. १६ : भोसरीतील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच आणि सात या सर्व प्रभागांमध्ये सर्वप्रथम टपाली मतदानाची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये चारही प्रवर्गातील भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली. त्यानंतर सलग चार फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर राहिले. त्यामुळे प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप उमेदवारांनी घेतलेली आघाडी उत्तरोत्तर वाढत गेली.
मोशी-डुडूळगाव-चऱ्होली प्रभाग क्र. तीन मधील ‘अ’ गटातील भाजपच्या सारिका गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या अनुराधा साळुंके यांच्यावर सुमारे १६ हजार मतांच्या फरकांनी दणदणीत विजय मिळवला. माजी महापौर नितीन काळजे त्यांनी प्रकाश आल्हाट यांच्या विरोधात तब्बल १९ हजार ६५३ मतांनी विजय मिळवला. अर्चना सस्ते यांनी पुनम तापकीर यांच्या विरोधात साडेबारा हजार मतांनी विजय मिळवला. सचिन तापकीर यांनी लक्ष्मण सस्ते यांच्याविरोधात १६ हजार मतांनी विजय मिळवला.
दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांनी घेतलेली आघाडी कायम ठेवत उत्तरोत्तर ती वाढत गेली. प्रभाग क्रमांक चारमधील सर्व उमेदवार मोठे फरकाने विजयी झाले. प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळाली. मतांची आघाडी कमी जास्त होत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढत होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भीमाबाई फुगे यांनी पिछाडी भरून काढत भारतीय जनता पक्षाच्या अनुराधा गोफणे यांच्यावर ७३६ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक सातमध्ये देखील मोठी चुरस पाहायला मिळाली. टपाली मतदानात तसेच पहिल्या दोन-तीन फेरीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. आघाडी कमी अधिक होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये शांतता होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज लांडे यांनी आघाडी घेतली. आघाडी कायम ठेवत त्यांनी अखेर आपले प्रतिस्पर्धी संतोष लोंढे यांच्यावर विजय मिळवला.
एक दृष्टिक्षेप -
- प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये एकतर्फी लढत, बहुतेक नवीन उमेदवारांना संधी
- भाजप उमेदवार विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना अक्षरशः धोबीपछाड.
- माजी महापौर नितीन काळजे यांचा मोठ्या फरकाने विजय
- प्रभाग क्र.४ मध्ये माजी नगरसेविका हिराबाई घुले यांचाही मोठ्या मताधिक्याने विजय
- प्रभाग क्रमांक पाच आणि सातमध्ये प्रचंड चुरस.
- पिछाडी भरुन काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भीमाबाई फुगे विजयी.
- प्रभाग क्र. ७ मध्ये प्रतिस्पर्धी संतोष लोंढे यांची आघाडी कमी करून तिसऱ्या फेरीपासूनच मताधिक्य घेत राष्ट्रवादीच्या विराज लांडे यांचा विजय.
- प्रभाग क्र.५ मध्ये सागर गवळी, जालिंदर शिंदे यांची प्रतिस्पर्ध्यांवर मात