पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग १६ मधून प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि गटातील शिवसेनेचे अनुक्रमे बाळासाहेब ओव्हाळ, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे आणि नीलेश तरस निवडणुकीच्या रिंगणात होते. या चारही उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती.
शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांची आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम होती. जसजसे मतमोजणीचे टप्पे पुढे जात होते, तसे शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे आणि नीलेश तरस यांची आघाडी वाढतच गेली. विरोधी पक्षातील एकाही उमेदवाराला एकाही फेरीत शिवसेनेच्या उमेदवारांची आघाडी मोडीत काढता आली नाही. चौदाव्या फेरीअखेर तिघांनी आघाडी घेऊन पाच ते सात हजार मतांनी विजय मिळवला. प्रभाग सोळामध्ये शिवसेनेला मतदारांनी साथ दिल्याचे दिसून येते.
आधी घरी गेले, आघाडी मिळताच कार्यकर्त्यांनी बोलवून घेतले
प्रभाग १६ मधून ‘अ’ गटात १३ उमेदवार रिंगणात होते. पण, मुख्य लढत भाजपचे धर्मपाल तंतरपाळे, शिवसेनेचे बाळासाहेब ओव्हाळ आणि राष्ट्रावादीच्या श्रेया तरस-गायकवाड यांच्यात झाली. या प्रभागातील शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांची आघाडी आठव्या फेरीपर्यंत कायम होती. शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी होणार अशा विश्वासाने पक्षाच्या नेत्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली. तर, विरोधकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. भाजपचे धर्मपाल तंतरपाळे हे देखील सहावी फेरी झाल्यानंतर घरी निघून गेले.
पण, आठव्या फेरीनंतरच तंतरपाळे यांचे नशीब उघडले. नवव्या फेरीत तंतरपाळे यांनी अचानक आघाडी घेतली आणि ओव्हाळ यांची निर्णायक एक हजार मतांची आघाडी मोडीत काढली. नवव्या फेरीनंतर तंतरपाळे यांनी ४९४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर आघाडी वाढतच गेली. शेवटच्या १४ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम होती. निवडणूक हातातून गेली म्हणून घरी गेलेल्या तंतरपाळे यांना एका कार्यकर्त्याने आघाडी घेतल्याचे फोन करुन सांगताच त्यांनीही पुन्हा मतमोजणी केंद्र गाठले आणि ६७७ मतांनी विजय मिळवून विजयी गुलाल उधळत जल्लोषात घर गाठले.