पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता राखली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची सत्ता २०१७ मध्ये उलथवून भाजपने बाजी मारली होती. ती सल भरून काढण्यासाठी व महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले. तरीही, त्यांना यश आले नाही. मात्र, २०१७ पेक्षा केवळ एक जागा अधिकची जिंकता आली. दरम्यान, भाजपने ७७ ऐवजी ८४ जागांवर मजल मारली. शिवसेनेला २०१७ मध्ये नऊ जागा होत्या. आता केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस व मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. भाजपचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दिलेला ‘१२५ पार’चा नारा पूर्ण करता आली नाही. तर, भाजपला लक्ष्य करत अजित पवार यांनी निवडणूक लढवली. पण, त्यांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे निकालातून दिसून आले.