पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा जिंकू हा भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास प्रत्यक्षात उतरला. मात्र, भाजपकडून सत्ता खालसा करून पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न धुळीस मिळाले. परंतु, त्यांना गेल्या वेळेइतक्या जागा राखत एक जागा अधिकची मिळवण्यात यश आले. भाजपने एक पाऊल पुढे टाकत गेल्या वेळपेक्षा सात जागा अधिक मिळवल्या.
शंभर पारचा भाजपचा नारा मात्र हवेत विरला. असे असूनही महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका निभावणार की राज्य व केंद्र सरकारमध्ये सहभागी असल्याने महायुती धर्म निभावणार हे, येणारा काळच सांगू शकेल. कोविड प्रतिबंधक नियमावली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आदी कारणांमुळे महापालिका निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी महापालिका निवडणूक होणे अपेक्षित होते. त्यानुसार निवडणूक झाली. शुक्रवारी (ता. १६) निकाल लागला असून भाजपने पुन्हा महापालिकेत सत्ता मिळवली. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत सात जागा अधिक मिळवल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांच्या सभांचाही काही अंशी वाटा आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघनिहाय आमदारांवर दिलेली जबाबदारीही महत्त्वाची ठरली.
भोसरी मतदारसंघातील प्रभागांची जबाबदारी आमदार महेश लांडगे, चिंचवडची जबाबदारी आमदार शंकर जगताप, पिंपरीची जबाबदारी आमदार अमित गोरखे यांच्याकडे होती. त्यांनी ती चोख पाडलेली दिसते. त्यांना आमदार उमा खापरे व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचीही साथ मिळाली. इतकेच नव्हे तर, काटे यांच्या टोपणनावाचा उल्लेख करून ‘पॅनेल टु पॅनेल चालवा’ असा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेला इशाराही महत्त्वाचा ठरला. शिवाय, शहरातील प्रभागनिहाय जागांचा विचार करून ‘जिंकण्याची क्षमता’ असलेल्या अन्य पक्षातील व्यक्तींना ऐनवेळी पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली, हेही गणित सरस ठरले आहे. मात्र काही ठिकाणी झटकाही बसला आहे. हा अर्थात पराभव विजयाच्या पंखांखाली झाकला गेला आहे. एबी फॉर्म अभावी पुरस्कृत करावी लागलेला उमेदवारही विजयी झाल्याने भाजपचा वारू सत्तेकडे एक पाऊल सरकला आहे. नामदेव ढाके, विलास मडिगेरी यांसारख्या दिग्गजांचा पराभव जिव्हारी लागलेला आहे. मात्र, यामागे काही राजकारण आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपची वाढती कमान
निवडणूक वर्षे / एकूण जागा / भाजपच्या जागा
१९८६ / ६० / ५
१९९२ / ७८ / ४
१९९७ / ७९ / ७
२००२ / १०५ / १३
२००७ / १०५ / ९
२०१२ / १२८ / ३
२०१७ / १२८ / ७७
२०२६ / १२८ / ८४
दृष्टिक्षेपात...
- २०१७ च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत १ अपक्ष निवडून आला होता. अन्य चार अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संख्याबळ ८२ होते
- २०२६ च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत १ अपक्ष निवडून आले आहे. त्यामुळे संख्याबळ ८५ झाले आहे.
- राज्य व केंद्र सरकारमध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महापालिकेच्या सत्तेत सहभागी होणार की विरोधी पक्ष म्हणून काम करणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.