अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः महापालिका निवडणुकीत विविध पक्षांच्या मातब्बर उमेदवारांना ‘नोटा’ (या पैकी कोणीही नाही) मतांचा मोठा फटका बसला आहे. विजयासाठी आवश्यक असलेली मते नोटाला गेल्याने अनेक प्रभागांत क्रमांक दोनवर राहिलेल्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. हीच मते उमेदवारांच्या पारड्यात पडली असती, तर अनेक ठिकाणी निकालाचे चित्र बदलले असते. असे प्रमुख लढतींमधील मतांवरून दिसत आहे.
प्रभाग ५ ः भाजपच्या अनुराधा गोफणे आणि राष्ट्रवादीच्या भीमाबाई फुगे यांच्यात चुरशीची लढत झाली. फुगे यांनी १३ हजार ५२३ मते घेत विजय मिळवला, तर गोफणे यांना १२ हजार ७८९ मते मिळाली आणि त्यांचा ७३४ मतांनी पराभव झाला. या जागेसाठी नोटाला ७५२ मते मिळाली.
प्रभाग ८ ः भाजपचे सुहास कांबळे यांना १२ हजार ६१८ आणि राष्ट्रवादीच्या सीमा सावळे यांना १२ हजार ३६२ मते पडली. सावळे यांचा अवघ्या २५६ मतांनी पराभव झाला. नोटाला ६९९ मते पडली.
प्रभाग १९ ः राष्ट्रवादीच्या सविता आसवानी अवघ्या २१ मतांनी विजयी ठरल्या. त्यांना ९ हजार ५२५, तर भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांना ९ हजार ५०४ मते मिळाली. या जागेसाठी नोटाला पडलेली १ हजार ४२५ मते निर्णायक ठरली. येथील ‘ड’ जागेसाठी राष्ट्रवादीचे काळुराम पवार यांना ३१४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पवार यांना ६ हजार ५५, तर भाजपचे मंदार देशपांडे यांना ६ हजार ३७० मते मिळाली. येथे नोटाला पडलेली मते ६२९ आहेत.
प्रभाग २२ ः भाजपच्या कोमल काळे यांना ९ हजार २९१ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या उषा काळे यांना ८ हजार ६१८ मते मिळाली. उषा काळे यांचा ६७३ मतांनी पराभव झाला. नोटाला ९३३ मते मिळाली.
प्रभाग २३ ः राष्ट्रवादीच्या योगिता बारणे या ८ हजार ४६६ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांना शेवटपर्यंत कडवी झुंज देणाऱ्या भाजपच्या सोनाली गाडे यांना ८ हजार २७ मते मिळाली. ७७१ मतदारांनी नोटाचे बटन दाबले आहे. ही मते गाडे यांना मिळाली असती, तर त्यांची एकूण मते ८ हजार ७९९ झाली असती.
प्रभाग २७ ः राष्ट्रवादीचे सागर कोकणे यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा अवघ्या ६०० मतांनी पराभव केला. कोकणे यांना १४ हजार ९६९, तर नखाते यांना १४ हजार ३६९ मते मिळाली. नोटाला पडलेली मते १ हजार ४०६ आहेत.
प्रभाग ३० ः राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांना रिपाइंचे उमेदवार मात्र भाजपच्या तिकिटावर लढलेल्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. बनसोडे यांना ८ हजार ७९८, तर सोनकांबळे यांना ८ हजार ८७ मते मिळाली. या प्रभागात ७४२ मतदारांनी नोटाचे बटन दाबले. अवघ्या ७११ मतांच्या फरकाने बनसोडे यांनी सोनकांबळे यांचा पराभव केला. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा लांघी-जवळकर यांनी ९ हजार ४८१ मते घेत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी नगरसेविका उषा मुंढे यांना ८ हजार ९४७ मते मिळाली असून त्यांचा अवघ्या ५३४ मतांनी निसटता पराभव झाला. या जागेसाठी नोटाला १ हजार २१९ मते मिळाली.
प्रभाग ३१ ः भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांनी अवघ्या ५२३ मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांनी कडवी झुंज देत ७ हजार ९८८ मते मिळवली, तर ज्ञानेश्वर जगताप यांना ८ हजार ५११ मते मिळाली. नोटाला पडलेली १ हजार ३६ मते आहेत. याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीप्ती कांबळे यांनी अवघ्या ७४५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना १० हजार ७३६ मते मिळाली, तर भाजपच्या दुर्गाकौर आदियाल यांनी तब्बल ९ हजार ९९१ मते मिळवली. या जागेसाठी १ हजार ५२८ मते नोटाला पडली आहेत.
प्रभाग ३२ ः राष्ट्रवादीचे अतुल शितोळे यांना अवघ्या २९० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे प्रशांत शितोळे यांनी ९ हजार ९८६ मते घेऊन विजय मिळवला, तर अतुल शितोळे यांना ९ हजार ६९६ मते मिळाली. नोटाला ४५२ मते पडली.