(जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे)
जेएसपीएमच्या ताथडवेतील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी देशभरातील आठ हजारांहून अधिक संघांशी स्पर्धा करून प्रतिष्ठित ‘कॅपजेमिनी एक्सेलर एजन्ट इफ एआय बिल्डॅथॉन’मध्ये ‘टॉप ५०’ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. या व्यासपीठामुळे नवोन्मेषकांना एआय ॲप्लिकेशन्सच्या पलीकडे जाऊन ‘एआय-सक्षम इंटेलिजंट एजंट्स’च्या पुढील पिढीचा शोध घेण्याचे आव्हान देते. एजेंटीक एआय, नावीन्य, समस्या-निवारण, ऑटोमेशन आणि प्रत्यक्ष जगावर होणारा प्रभाव यांवर लक्ष केंद्रित करणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे अशा ‘इंटेलिजंट सोल्युशन्स’मध्ये (बुद्धिमान उपाययोजनांमध्ये) रूपांतर करण्यास प्रोत्साहित करते. याने विद्यार्थ्यांमधील असाधारण नावीन्य, तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, सांघिक कार्य आणि सर्वोच्च राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता यांचे प्रतीक आहे. हे यश म्हणजे ‘स्टुडंट्स प्रोग्रेशन अँड इंडस्ट्री रिलेशन्स सेल’द्वारे उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील संबंध दृढ करणे, उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, नावीन्यपूर्ण संस्कृती रुजवणे आणि रोजगारक्षमतेवर आधारित शिक्षण देणे यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. सौरभ तायडे, विभागप्रमुख डॉ. रिंकू डुल्लु, प्राचार्य डॉ. अविनाश बडधे, संकुल संचालक डॉ. सुधीर भिलारे यांचे मार्गदर्शन लाभले. साहिल अरोरा, ईशान देसले, अथर्व राजे, ध्रुवांश मिश्रा, अथर्व माळी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
‘युरेका आयडियाथॉन’ स्पर्धा यशस्वी
(एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी)
एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी येथील आर अँड डी सेल आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्लायमेट ॲक्शन युनिटच्या सहकार्याने ‘युरेका आयडियाथॉन २०२६’ या अभिनव संकल्पना सादरीकरण स्पर्धा यशस्वी झाली. विद्यार्थ्यांमधील नवकल्पना, सर्जनशीलता आणि उद्योजकतेला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यात ५३ विद्यार्थी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नावीन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन संघांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविले. विनामूल्य प्रवेश होता. ‘यूवर आयडिया, युवर व्हाइस, युवर इम्पॅक्ट’ या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध वास्तविक समस्यांवरील सर्जनशील उपाय सादर केले. आशीष जोशी, विवेक कुमार, शांतनू लाकल आणि डॉ. स्वप्नेश टाटेरह यांनी परीक्षण केले. त्यांच्या मार्गदर्शन व रचनात्मक अभिप्रायामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना अधिक प्रभावीपणे विकसित करण्यास मदत झाली. शिवप्रसाद जाधव विद्यार्थी तर निशिगंधा भालेकर, सोनाली अभंग आणि डॉ. तृप्ती कुलकर्णी प्राध्यापक समन्वयक होते. डॉ. वैशाली खेरडेकर, डॉ. संदीप ढवळे आणि शुभांगी गायकर यांचे मार्गदर्शन लाभले. समारोपप्रसंगी डॉ. बाळासाहेब वाफारे (संचालक) आणि डॉ. अक्षदा कुलकर्णी (उपसंचालक) प्रमुख उपस्थित होते. ‘युरेका आयडियाथॉन २०२६’ या उपक्रमातून संस्थेची नवकल्पना, शाश्वत विकास आणि उद्योजकतेची संस्कृती जोपासण्याची बांधिलकी अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांना कल्पना मांडण्यासाठी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी मिळालेल्या या व्यासपीठाने युवा प्रतिभेला नवी दिशा दिली, असे डॉ. वाफारे यांनी सांगितले.
स्वच्छता, निवडणूक जनजागृती
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘हर घर तिरंगा’, स्वच्छता अभियान आणि निवडणूक जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, स्वच्छता, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाहीतील सहभाग याबाबत जनजागृती करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘तिरंग्यासोबत सेल्फी’ उपक्रमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर व देशभक्ती व्यक्त केली. विद्यार्थिनींना स्वच्छतेची शपथ दिली. परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे तसेच स्वच्छ व निरोगी भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला. तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तिपर घोषणा देत सहभाग नोंदवला. याद्वारे राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला. निवडणूक व मतदार जनजागृती केली. मतदानाचे महत्त्व, मतदानाचा हक्क आणि प्रत्येक नागरिकाची लोकशाही प्रक्रियेतील जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांनी जागरूक व जबाबदारपणे मतदान करावे, यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. रेखा भालेराव यांनी संयोजन केले. विद्यार्थी समन्वयक प्रांजल बंकर, जान्हवी जगताप, ज्योतिनंद हिरवे यांनी सहकार्य केले. ‘देशभक्ती, स्वच्छता आणि जबाबदार मतदान ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्ये आहेत’ हा संदेश दिला.
---