पिंपरी, ता. १२ : गॅस तुटवड्याचा परिणाम उद्योग, हॉटेलचालक यांच्या पाठोपाठ आता आयटी कंपन्यांमध्ये उपहारगृह चालकांनाही सोसावा लागत आहे. अनेक कंपन्यांमधील उपहारगृहांमध्ये पदार्थांवर मर्यादा आणण्यात आली आहे. ‘‘गॅसऐवजी इलेक्ट्रिक उपकरणे वापरून तयार करता येणारे पदार्थ उलपब्ध असतील,’’ असे कंपनी व्यवस्थापनांनी कळवले आहे. तसेच ‘‘कर्मचाऱ्यांनी घरून डबे आणावेत,’’ असेही आवाहन करण्यात आले आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये असणाऱ्या मोठ मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये हजारो आयटी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आयटी अभियंत्यांचा समावेश आहे. घरापासून दूर राहणाऱ्या किंवा बॅचलर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळात नाश्ता व जेवणासाठी कंपनीच्याच उपहारगृहातील पदार्थांवर अवलंबून रहावे लागते. मात्र, व्यावसायिक गॅसपुरवठा बंद झाल्यामुळे उपहारगृहे चालविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे हिंजवडीतील मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबे आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ‘‘यामुळे घराबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे मात्र हाल होणार आहेत,’’ असे आयटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
‘वर्क फ्रॉम होम’ द्या
साधारण कोणत्याही कंपनीमध्ये दर महिन्याला किंवा तिमाहीला काही कार्यक्रम घेतले जातात. कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग, सेमिनार याचेही अनेकदा आयोजन केले जाते. या कार्यक्रमांनंतर जेवण किंवा अल्पोपहाराची व्यवस्था असतेच. मात्र, गॅस तुटवड्यामुळे या आयटी कंपनी व्यवस्थापनाकडून ‘‘कार्यक्रमांंचे आयोजन करू नये,’’ असे आवाहन करण्यात आले आहे. गॅस तुटवड्यामुळे उपहारगृह बंद राहणार असेल तर इंधन बचतीसाठी ‘‘वर्क फ्रॉम होम का दिले जात नाही,’’ असा प्रश्न आयटीयन्स विचारत आहेत.
उपहारगृहे, हॉटेल व खानावळ बंद झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका घरापासून बाहेर राहणाऱ्यांना बसणार आहे. असे झाल्यास त्यांना आपल्या शहरातून किंवा घरून काम करण्याची मुभा देणे आवश्यक आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करताना सरकारने त्याला पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. तसे केले असते, तर ही समस्या उद्भवली नसती.
- पवनजित माने, अध्यक्ष, ‘एफआयटीई’
PNE26W03058
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.