पिंपरी, ता. १५ : शहरातील महादेव मंदिरांना करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई, पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी असे वातावरण शहरात दिसून आले. ‘हर हर महादेव’चा नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. रविवारचा दिवस असल्याने नागरिकांनी सहकुटुंब मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारीदेखील रांगा कायम होत्या. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांच्या सभागृहासह गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
चिंचवडगावातील श्री धनेश्वर मंदिर, पिंपरी गावातील तपोवन मंदिर, निगडी प्राधिकरणातील नीळकंठेश्वर मंदिर, शिवधाम मंदिर, शाहूनगर येथील शिवशंभो फाउंडेशनचे मंदिर, पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर, चऱ्होलीतील श्री वाघेश्वर महाराज मंदिर, कासारवाडीतीस महादेव मंदिर या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. उपनगरांमधील शिवालयदेखील गजबजून गेली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराबाहेर सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. भाविकांची सोय व्हावी यासाठी दर्शनरांगा आखण्यात आल्या होत्या. अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. तर काही ठिकाणी कीर्तन, भजन, होमहवन या धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री वाघेश्वर मंदिरात यात्रेला सुरुवात
चऱ्होलीचे ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज उत्सव व महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली. सकाळपासून नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होती. दर्शनासाठी झालेली गर्दी पाहता मंदिर परिसर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सकाळी श्री वाघेश्वर महाराज यांच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेनिमित्त पुढील दोन दिवसांत बैलगाडा शर्यत व कुस्ती आखाडा रंगणार आहे.
फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी
महाशिवरात्रीचा उपवास नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. म्हणूनच बाजारात केळी, फळे, दूध, सुका मेवा, राजगिरा लाडू यांची मागणी वाढल्याचे चित्र होते. मंदिरांत येणाऱ्या भाविकांनाही मंदिर व्यवस्थापन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या वतीने खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.