सकाळ वृत्तसेवा : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : चिंचवड रेल्वे स्थानकाच्या फलाटाची (प्लॅटफॉर्म) लांबी वाढविण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना या स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
पुणे आणि लोणावळा या शहरांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक म्हणून चिंचवड रेल्वे स्थानकाची ओळख आहे. ‘अमृत भारत’ स्थानक विकास योजनेअंतर्गत २० कोटी ४० लाख कोटी रुपये खर्चून याचा स्थानकाचा पूनर्विकास केला जात आहे. यात दोन लिफ्ट, स्वयंचलित जिने, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, डिजिटल माहितीफलक, रेखांकित केलेली चिन्हे, पदपथ, सुनियोजित पार्किंग उभारण्यात येत आहे. मात्र, स्थानकातील प्लॅटफार्मची लांबी ‘जैसे थे’ ठेवली आहे. स्थानकाचा पुनर्विकास करताना रेल्वे प्रशासनाने भविष्यातील गरजा, नागरिकांच्या मागण्यांचा कोणताही विचार केल्याचे दिसून येत नाही, असा आरोप होत आहे.
फलाटाची लांबी कमी असल्याने चिंचवड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविणे शक्य नाही, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ‘अमृत भारत’ स्थानक विकास योजनेअंतर्गत चिंचवड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले, तरी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची फरफट कायम राहणार असल्याची स्थिती आहे.
काय आहेत अडचणी...
चिंचवड रेल्वे स्थानकावर सध्या चार फलाट आहेत. यातील एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटांची (मुंबई ते पुणे लाइन) लांबी १९ डब्यांच्या गाड्या थांबू शकतील एवढीच आहे. तर फलाट तीन आणि चारची (पुणे ते मुंबई लाइन) लांबी २३ डब्यांच्या गाड्या थांबू शकतील एवढी आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर नांदेड-पनवेल, सिंहगड एक्स्प्रेस, दौंड-इंदूर, कोयना एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. दौंड-इंदूर गाडी २३ डब्यांची आहे. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे या गाडीला एकाच प्लॅटफॉर्मवर दोनदा थांबा द्यावा लागत आहे. सर्व एक्स्प्रेसला थांबा देण्यास फलाटाची लांबी अडसर ठरत असल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत. पण, तरीही फलाटाची लांबी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही.
चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. पण, प्रत्येक वेळी फलाटाची लांबी आणि इतर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून आमच्या मागणीकडे प्रत्येकवेळी दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करुन सर्व एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा.
- इकबाल मुलानी, माजी अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना
चिंचवड येथील रेल्वे स्थानकातील फलाटाची लांबी वाढविण्यास काही तांत्रिक अडथळे आहेत. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे.
- रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.