पिंपरी-चिंचवड

भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाघजाई चौक येथे प्राणघातक हल्ला

CD

पिंपरी : भांडण मिटवून तडजोड करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयत्याने आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना नवी सांगवीतील वाघजाई चौक येथे घडली. वेदांत मदने असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वेदांतच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश गणेश शिंदे (रा. राजाराम नगर, नवी सांगवी) याला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अंशुमन कागडा आणि विकास उर्फ विशु कांबळे यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा वेदांत मदने आणि इतर मित्र गेले होते. त्यावेळी आरोपींनी वेदांतवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी : एमएनजीएल गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील उद्यमनगर येथे घडला. याप्रकरणी एका व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश पटेल आणि दशरथ वालेकर या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला व्हॉट्सॲपवर एक नोटीस आली होती, ज्यामध्ये बिल न भरल्यामुळे गॅसजोड बंद केले जाईल, असे म्हटले होते. फिर्यादीने खात्री करण्यासाठी संपर्क साधला असता, आरोपीने त्यांना १० रुपये भरण्यास सांगून कार्डची माहिती मिळवली. ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचे भासवून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल १५ लाख रुपये काढून घेतले.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या तडीपार गुंडाला पिंपरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. कुणाल उर्फ चिक्या विजय कदम (रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी कुणाल याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे. तरीही तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःकडे बेकायदारित्या कोयता बाळगला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक कोयता जप्त केला.

चिखलीत टोळक्याची दहशत; तिघांना बेदम मारहाण
पिंपरी : एका टोळक्याने ‘आम्ही इथले दादा आहोत’ असे म्हणत परिसरात दहशत माजवून तीन तरुणांना कोयत्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना चिखली, मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौक येथे घडली. याप्रकरणी सिद्धेश वाघमारे (रा. नेवाळे वस्ती, चिखली) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हरीश त्रिपाठी (रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक केली आहे. तर अमर घोडके, गणेश राठोड, सोन्या जाधव आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एका रिक्षाचालकावर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली. कुणाल डोईफोडे (रा. एकवीरानगर, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुणाल हा त्याच्या रिक्षातून विक्रीसाठी अमली पदार्थ घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सात हजार ४०० रुपये किमतीचा गांजा मिळून आला.

कुदळवाडी येथे मेफेड्रॉनसह एकाला अटक
पिंपरी : मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ मुंबईहून विक्रीसाठी आणलेल्या एकाला मेफेड्रॉनसह चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखलीतील कुदळवाडी येथे करण्यात आली. फिरोज फैमुल्ला खान (रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार बासू सईद (मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फिरोज हा विक्रीसाठी ८.३ ग्रॅम मेफेड्रोन घेऊन आला होता. त्याच्याकडून अमली पदार्थासह एक दुचाकी, एक मोबाईल असा एकूण एक लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने मेफेड्रोन मुंबईतील बासु सईद कडून आणल्याचे तपासात समोर आले.
---

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT